State Excise Department Nilanga Latur
निलंगा : निलंगा-उदगीर मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे शासनाचे धोरण असताना, संबंधित विभागाचे काही कर्मचारीच हप्ते वसूल करून त्याच व्यावसायिकांवर कारवाई करत असल्याचा आरोप पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या एका हॉटेल मालकाने भररस्त्यात कर्मचाऱ्यांना अडवून जाब विचारल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा-उदगीर रोडवरील ‘हॉटेल माधुरी’ येथे घडलेली ही घटना असून, हॉटेल मालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचाऱ्यांना वाहनासह अडवले. संबंधित कर्मचाऱ्यांनी हॉटेलवर कारवाई केल्यामुळे संतापलेल्या मालकाने, “दरमहा हप्ते घेता आणि नंतर आमच्यावरच कारवाई करून वरिष्ठांना काय दाखवता?” असा थेट सवाल केला. या घटनेदरम्यान कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडून नियमित हप्ते घेतले जातात आणि नंतर केवळ कागदोपत्री कामगिरी दाखवण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाते, असा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या प्रकारामुळे विभागाची प्रतिमा मलिन होत असून प्रामाणिक अधिकाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे.
विशेष म्हणजे, व्हिडिओ समोर आल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, निलंगा तालुक्यातील अनेक बार आणि रेस्टॉरंटमध्ये वाईन शॉपमधील दारू बेकायदेशीररित्या विकली जात असल्याचीही चर्चा आहे. यावर उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने ‘हप्तेखोरी’मुळेच हे प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे.
तसेच, लातूर-जहीराबाद महामार्गावरही अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्याचे समोर येत आहे. या मार्गावरील काही हॉटेल्स व धाब्यांमधून उघडपणे बेकायदेशीर दारू विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे प्रवाशांना, विशेषतः महिलांना, त्रास सहन करावा लागत असून मद्यधुंद चालकांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
एकूणच, हप्तेखोरीच्या आरोपांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर संशयाची छाया निर्माण झाली असून या प्रकारावर तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.