

निलंगा : साई नगर मुबारकपूर तांडा येथील तलावात उडी मारून जीवन संपवल्याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी निलंगा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सात जणाविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी गोरोबा रामराव कांबळे (वाडीकर) रा.आंबेडकर नगर निलंगा यांची मुलगी पौर्णिमा गोरोबा कांबळे वय २९ वर्षे हिने २५ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली.
शहरातील दापका हद्दित असलेल्या येथील साई नगर सोसायटी येथील तलावातील पाण्यात उडी मारून दिनांक 25 सप्टेंबर रोजी 5 वाजता आत्महत्या केली होती. माझ्या मुलीस लग्नाचे अमिष दाखवून मयत हिस जातीवाचक शिवीगाळ करून तू मातंग समाजाची आहेस. मी तुझ्या सोबत लग्न करू शकत नाही म्हणून माझ्या मुलीस आरोपीने आत्महत्यास प्रवृत्त केल्यामुळे सुरज विजयकुमार मुळे वय 29 वर्षे, वडील विजयकुमार शेषराव मुळे, आई शुकुंतला विजयकुमार मुळे, भाऊ धिरज विजयकुमार मुळे हे सर्व राहणार साई नगर दापका व मामा बि.झेड.जाधव रा.नळेगाव, अॕटो चालक अनिकेत याच्यासह एकूण सात जणाविरुद्ध निलंगा पोलिस ठाण्यात दिनांक 29 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.
डान्स क्लासेसच्या माध्यमातून पौर्णिमा व सुरज यांची ओळख झाली होती. फोनवर सतत दोघेही बोलायचे त्यातच त्यांचा संपर्क वाढला ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु प्रेमविवाहला मुलाकडील कुटुंबातील लोकांचा विरोध होता. त्यानंतर मात्र सुरजने संपर्क कमी केला व पुणे येथे गेला व फोन नंबर ब्लॉक करून ठेवल्याने सदरील मुलीने जीव दिल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी जातीवाचक शिवीगाळ करून ती मातंग समाजाची आहे या कारणावरून तिचे सोबत लग्न करण्याचे टाळून तिच्यावर जीवन संपवण्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे पाटील हे करीत आहेत.