Latur News : रत्नापूरमध्ये गढूळ पाणीपुरवठा; ग्रामस्थांचा संताप file photo
लातूर

Latur News : रत्नापूरमध्ये गढूळ पाणीपुरवठा; ग्रामस्थांचा संताप

आंदोलन करण्याचा इशारा; आठ ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

Muddy water supply in Ratnapur; villagers outraged

रत्नापूर, पुढारी वृत्तसेवा : कळंब तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कारभार सध्या ग्रामस्थांच्या रोषाचा विषय ठरत आहे. गावात पाणी उपलब्ध असतानाही आठ ते पंधरा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असून, गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नळातून येणारे पाणी पिण्यास तर दूरच, कपडे धुण्यासाठीही योग्य नाही. दूषित पाण्यामुळे साथीचे व पोटाचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत सरपंच सुनील वाघमारे यांनी, "तीन ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे गढूळ पाणी येत आहे," असे सांगितले. मात्र पाईपलाईन दुरुस्तीस विलंब का झाला, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीचा पाच रुपयांत स्वच्छ पाण्याचा जार उपलब्ध करून देणारा प्रकल्पही गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे.

त्यामुळे नागरिकांना खासगी विक्रेत्यांकडून २५ ते ३० रुपये मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. रत्नापूरला बांगरवाडी तलावातून पाणीपुरवठा केला जातो. जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे ७० लाख रुपये खर्च करून शुद्ध पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र सध्या गढूळ पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

ग्रामस्थांनी पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच बंद पडलेला जार प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी केली आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT