Mahayuti flag hoisted over Latur's mini ministry
शहाजी पवार : लातूर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अखेर महायुतीने बाजी मारली आहे. ५९ जागांच्या या अटीतटीच्या लढतीत काँग्रेस २३ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युतीमुळे सत्तेचे गणित महायुतीकडे झुकले आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीची निष्ठा आणि भाजपचे संख्याबळ यामुळे लातूरच्या 'मिनी मंत्रालया'वर महायुतीचाच झेंडा फडकणार हे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी झालेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढती झाल्या. काँग्रेसने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या. त्याखालोखाल भाजपने १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) १२ जागांवर विजय मिळवला. अपक्ष २, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट), उबाटा शिवसेना, मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी प्रत्येकी १ जागा जिंकली आहे.
युतीधर्मामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा
महायुतीचे एकत्रित संख्याबळ (भाजप १८+ राष्ट्रवादी १२) ३० होते. त्यातच निलंगा तालुक्यातील तांबाळा गटातील भाजप पुरस्कृत विजयी अपक्ष उमेदवार आणि मित्रपक्षाची साथ यामुळे महायुतीचा आकडा ३२ च्या घरात पोहोचत आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेली ही बेरीज जुळून आल्याने आणि युतीधर्म पाळला जाणार असल्याने महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.
काँग्रेसची मुसंडी, पण सत्ता हुकली
मागील निवडणुकीत भाजपकडे ३६ तर काँग्रेसकडे १५ जागा होत्या. यावेळी देशमुखांच्या लातूरमध्ये काँग्रेसने जोरदार कमबॅक केले आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ८ जागांची भर घालत संख्याबळ २३ वर नेले. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना यश आले नाही.
राष्ट्रवादी ठरली किंगमेकर
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंगमेकर ठरली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार संजय बनसोडे यांचे सूक्ष्म नियोजन आणि अजितदादांच्या निर्वाणामुळे मिळालेली सहानुभूतीची लाट पक्षाला १२ जागा मिळवून देण्यात यशस्वी ठरली. भाजप नेत्यांचे प्रयत्न आणि राष्ट्रवादीची साथ यामुळेच महायुतीचे सत्तास्वप्न पूर्ण होत आहे.
भूम तालुक्यात शिंदे सेनेला बहुमत; भाजप, ठाकरे सेनेचा सुफडासाफ
अब्बास सय्यद : भूम तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), ठाकरे शिवसेना व भाजप यांनी स्वतंत्रपणे लढत दिल्याने चुरशीची लढत पाहायला मिळाली.
निकालानुसार जिल्हा परिषदेत शिंदे शिवसेनेने पाचपैकी तीन जागांवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने दोन जागा पटकावल्या. ठाकरे शिवसेना व भाजपला खाते उघडता आले नाही. पंचायत समितीच्या निवडणुकीतही चौरंगी लढत रंगली. दहा गणांपैकी शिंदे शिवसेनेने पाच गण जिंकत प्रथम क्रमांक पटकावला.