Udgir Married Woman Harassment
उदगीर : हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि दिराविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटना पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथे घडली असून, पीडित महिलेच्या तक्रारीवरून उदगीर येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदगीर येथील पीडितेचा विवाह अजय महादेव कांबळे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे सहा महिने संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून "हॉटेल सुरू करण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये," अशी मागणी करण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीने ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर २७ जून २०२५ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तिला उपाशी ठेवणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार कुरकुंभ (ता. दौंड, जि. पुणे) येथे घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पती अजय महादेव कांबळे, सासू लक्ष्मीबाई महादेव कांबळे आणि दिर विजय महादेव कांबळे (सर्व रा. समाज मंदिर शेजारी, कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८२/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार उस्तुर्गे करीत आहेत.