Abhishek Deshpande  (Pudhari Photo)
लातूर

Latur News | अभिमानास्पद! सांडोळ येथील एसटी चालकाच्या मुलाची भारतीय कर्णबधीर क्रिकेट संघात निवड

Success Story Abhishek Deshpande : अभिषेक देशपांडे खेळणार आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका

पुढारी वृत्तसेवा

Indian deaf cricket team

संग्राम वाघमारे

चाकूर : कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर एस टी चालकाचा मुलगा अभिषेक देशपांडे याची भारतीय कर्णबधीर क्रिकेट संघात निवड झाली. तो भारत आणि नेपाळ यांच्यात २७ ऑक्टोबररोजी चंदीगड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेत भारताकडून खेळणार आहे.

अभिषेकची निवड भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघासाठी एक अभिमानास्पद क्षण ठरला आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील सांडोळच्या अभिषेक देशपांडेची भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मालिकेसाठी ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ अंतर्गत भारतीय कर्णबधीर संघात निवड झाल्याचे पत्र २५ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले.

ही अतिशय कौतुकास्पद बाब असून या कामगिरीमुळे तो राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेसाठी अभिषेक मध्यप्रदेशातील इंदोरहून दिल्लीसाठी रवाना झाला आहे. पंजाब राज्यातील चंदीगड येथे पंजाब डेफ अँड डंब स्पोर्ट्स असोसिएशन, पटियाला यांच्या माध्यमातून या स्पर्धा होत आहेत. भारत आणि नेपाळ या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका सोमवारी दि. २७ ऑक्टोबर २०२५, मंगळवार २८ ऑक्टोबर २०२५ आणि बुधवार २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान तीन सामने खेळवले जाणार आहे.

१६ खेळाडूंमध्ये ६ व्या क्रमांकावर २२ वर्षीय अभिषेक देशपांडेची फलंदाज म्हणून निवड झाली आहे. अभिषेक श्रीरंग देशपांडे हा एस टी चालकाचा मुलगा आहे. तो जन्मजात कर्णबधिर आहे. त्याचे शिक्षण लातूर येथील विजयगोपाल मूकबधिर विद्यालयात १० वी पर्यंतचे पूर्ण झाले. ११ वी १२ वाणिज्य शिक्षण मध्यप्रदेशातील इंदोर येथील मूकबधिर संघटन स्कीम येथे सुरु असतानाच त्याची भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मालिकेसाठी भारतीय कर्णबधिर संघात निवड झाली.

गेल्या तीन वर्षांपासून अभिषेक कर्णबधिर क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. त्याच्या अष्टपैलू खेळामुळे आणि संघनायक गुणांमुळे निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखविला आहे. स्थानिक क्रिकेट संघटनेतून खेळताना अभिषेकने अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक वेळा आपली छाप सोडली आहे. त्याच्या फलंदाजीसोबतच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि शिस्तबद्ध खेळामुळे तो संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे.

भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांनीही अभिषेकच्या निवडीचे स्वागत केले आहे. त्याच्याकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय कर्णबधिर क्रिकेट असोसिएशनने या मालिकेची तयारी सुरू केली असून, ही स्पर्धा दोन्ही देशांतील विशेष खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन देणारी नक्कीच ठरणार आहे. अभिषेकच्या या निवडीमुळे त्याच्या कुटुंबीयांमध्ये, मित्रपरिवारात तसेच स्थानिक क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

या निवडीबद्दल बोलताना अभिषेकचे वडील श्रीरंग देशपांडे म्हणाले भारतीय संघासाठी खेळण्याचे स्वप्न अभिषेक लहानपणापासून पाहत होता. माझ्या मुलाला बोलता आणि ऐकता येत नसतानाही त्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत यामुळे तो आता देशासाठी सर्वोत्तम खेळ करेल असा मला विश्वास असल्याचे पुढारीशी बोलताना सांगितले.

अभिषेकचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील राज्य परिवहन मंडळात कमी पगारात चालक म्हणून कार्यरत, जेमतेम परिस्थितीतही त्यांनी मुलाच्या स्वप्नांना उभारी दिली. माळरानावर शेती, आई प्रतीक्षा देशपांडे घरकाम, त्यांचा दुसरा मुलगा शुभम ही गतीमंद आहे, तरीसुद्धा कुटुंबाने धैर्य आणि जिद्दीने जीवनाचा प्रत्येक टप्पा पार केला. या संघर्षातूनच अभिषेक क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप उमटवणार हे मात्र नक्की

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT