चाकूर : तालुक्यातील राच्चनावाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाची स्कूल बस सांडोळ–महांडोळ मार्गावर पलटी होऊन अपघात झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ९ वाजता घडली. या बसमध्ये सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी प्रवास करत होते, त्यामधील २३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून सर्व विद्यार्थी थोडक्यात बचावले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेचा नियमित चालक आळंदी वारीसाठी गेल्याने त्याच्या जागी दुसऱ्या चालकाला त्याने बदलीवर पाठविले होते. त्याची माहिती शाळा प्रशासनाला दिली नव्हती असे सांगितले जात आहे. बुधवारी सकाळी स्कुल बस क्रमांक एम एच 12 पी क्यू 5120 नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेली असताना तो चालक बस चालवत असताना मोबाईलवर बोलत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात १९ विद्यार्थ्यांना दुखापत झाली असून इतर विद्यार्थीही मोठ्या धक्क्यातून बचावले. त्या विद्यार्थ्यांना तात्काळ ऍम्ब्युलन्सने चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चालक बदलण्यात आल्याची माहिती शाळा व्यवस्थापन किंवा मुख्याध्यापकांना होती का, नवीन चालकाची पडताळणी करण्यात आली होती का, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, याबाबत पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
शालेय बसमध्ये विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी शिक्षक किंवा अधिकृत कर्मचारी असणे अपेक्षित असताना त्याची अंमलबजावणी झाली का, हाही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे चढविणे-उतरणे आणि प्रवासादरम्यान त्यांची काळजी घेणे ही चालकाबरोबरच शाळा प्रशासनाचीही जबाबदारी आहे. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वेळीच मोठा अनर्थ टळला असला तरी या अपघाताने शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे गंभीर चित्र समोर आले आहे. संबंधित चालकावर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, अशी मागणी पालक व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली.
ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी
शाळेच्या बसचा अपघात झाल्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात ऍम्ब्युलन्सने उपचारासाठी नेण्यात आले. ऍम्ब्युलन्स ग्रामीण रुग्णलयात येताच विद्यार्थ्यांच्या नातेवाईकानेही एकच गर्दी केली होती. दरम्यान यावेळी गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे उपस्थित होत्या.