Accident News pudhari photo
लातूर

Latur Nanded Highway Accident | लातूर रोड टी-पॉईंटवर आणखी एक बळी; लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्ग नियोजनातील त्रुटी कायम

अपघातांचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत, मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Latur Nanded Highway Planning

चाकूर : लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील लातूर रोड बायपास टी-पॉईंट परिसरात अपघातांचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नसून मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजनातील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मृत व्यक्तीचे नाव पंडित नामदेव पवार (वय ५७, रा. शंकरनगर तांडा, वडवळ) असे आहे. पवार हे मोटारसायकलवरून आपल्या गावाकडे जात असताना लातूर रोड बायपास टी-पॉईंटजवळ उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ऑटोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

स्थानिकांच्या मते, लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील हा टी-पॉईंट परिसर अपघातप्रवण ठरत आहे. लातूर रोड येथील सुमारे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल टी-पॉईंटवर संपत असल्याने घरणी आणि परिसरातील नागरिकांना महामार्ग ओलांडताना मोठा धोका पत्करावा लागतो. उड्डाणपुलाच्या उतारामुळे वाहनांचा वेग अधिक असतो आणि तो नेमका ओळखणे कठीण जात असल्याने वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांनी या ठिकाणी सर्व्हिस रोड, उड्डाणपुलाची वाढीव लांबी किंवा अन्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

याच ठिकाणी यापूर्वी घरणीचे उपसरपंच शिवाजी बैनगीरे यांचाही गंभीर अपघात झाला होता. दोन वाहनांच्या मध्ये सापडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. या अपघातात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्यांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागले. तसेच अनेक शेतकरी आणि वाहनचालकांनाही हा मार्ग जीव धोक्यात घालून ओलांडावा लागत असल्याची तक्रार आहे.

लातूर रोड टी-पॉईंट हा दिवसेंदिवस तालुक्यातील धोकादायक अपघातस्थळ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पुरेशा सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, वेग नियंत्रणासाठी प्रभावी यंत्रणेचा अभाव आणि अपूर्ण पायाभूत नियोजन यामुळे येथे अपघातांची मालिका सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पंडित पवार यांच्या मृत्यूनंतर या प्रश्नाची तीव्रता पुन्हा समोर आली असून भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टी-पॉईंट बनला ‘अपघातांचा हॉटस्पॉट’

नांदगावनंतर लातूर रोड बायपास टी-पॉईंट हा तालुक्यातील सर्वाधिक धोकादायक अपघातस्थळ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येथे उड्डाणपूल, सर्व्हिस रोड किंवा अन्य सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी लातूर रोड टी-पॉईंटवर माझा गंभीर अपघात झाला होता. रस्ता ओलांडताना दोन वाहनांच्या धडकेत मी सापडलो आणि माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. जवळपास वर्षभर उपचार घ्यावे लागले. या ठिकाणच्या अपुऱ्या नियोजनामुळेच अपघात घडत आहेत. पंडित पवार यांचाही जीव याच कारणामुळे गेला आहे.
— शिवाजी बैनगीरे, अपघातग्रस्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT