Latur Revenue Lok Adalat pudhari photo
लातूर

Latur Revenue Lok Adalat : ३० सप्टेंबरला महात्मा फुले महसूल लोकअदालत

प्रलंबित अर्धन्यायिक महसुली प्रकरणांचा तडजोडीने होणार निपटारा

पुढारी वृत्तसेवा

लातूर : जमिनीशी संबंधित प्रलंबित महसुली दावे व अपिले सामंजस्याने आणि कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका, उपविभाग व जिल्हास्तरावरील महसूल न्यायालयांमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ही लोक अदालत होणार आहे.

महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये विविध महसुली दावे व अपिले प्रलंबित आहेत. एका स्तरावर निकाल लागल्यानंतर पक्षकारांकडून वरिष्ठ न्यायालयात अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल केले जात असल्याने अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. अशा प्रकरणांचा दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने कायदेशीर तडजोडीतून निपटारा करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर हे अभियान राबविले जात आहे. लोक अदालतीमुळे महसूल न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होण्यासोबतच पक्षकारांचा वेळ व खर्चही वाचणार आहे. या अभियानांतर्गत दर तीन महिन्यांनी मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकारी स्तरापर्यंत महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

दरम्यान, लोक अदालतीपूर्वी पक्षकारांना कायदेशीर मार्गदर्शन मिळावे यासाठी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये विशेष समुपदेशन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ज्या महसूल न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे, तेथील दोन्ही पक्षकारांनी संयुक्त स्वाक्षरीसह वकिलामार्फत विहित ‘प्रपत्र-अ’मध्ये तडजोड अर्ज व कायदेशीर तडजोडनामा किमान पाच दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे.

अपील मागे घ्यायचे असल्यास त्याबाबतचा अर्जही सादर करावा लागेल. अर्जांची छाननी करून दोन्ही पक्षांची संमती निश्चित झाल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत अंतिम आदेश पारित करून प्रकरण निकाली काढण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT