

वाशी : पावसाने पाठ फिरवल्याने वाशी तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला असून, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी आणि पीकविम्याची भरपाई तातडीने मिळावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि. १५) तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांना देण्यात आले.
धाराशिव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर आणि वाशी तालुका काँग्रेस अध्यक्ष अमरसिंह तागडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, वीज बिलात सवलत, शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा तसेच पशुधनासाठी चारा, पाणी व औषधांची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.
वाशी तालुक्यात सुमारे ३० हजार ४१९ दुधाळ जनावरे असून, दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पशुधन वाचवण्यासाठी शासनाने तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार म्हेत्रे यांनी पहिल्या टप्प्यात २५ गावांची यादी तयार करून देण्याच्या सूचना काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिल्या. ही यादी प्राप्त होताच संबंधित गावांमध्ये जनावरांसाठी तातडीने चारा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी दिलीप क्षीरसागर, शामराव भोसले, बाळासाहेब गापाट, हनुमंत सुकाळे, पिंटू आढागळे, दयावान पवार, गजानन जगताप, तानाजी शिंदे, बाळासाहेब बनसोडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. ‘वाशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालाच पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील,’ असा निर्धार अमरसिंह तागडे यांनी व्यक्त केला.