Latur Rain News : पिके वाळू लागली; रेणा धरणात २१ टक्केच जलसाठा file photo
लातूर

Latur Rain News : पिके वाळू लागली; रेणा धरणात २१ टक्केच जलसाठा

रेणापूर तालुक्यात मागील दोन महिण्यांपासुन पावसाने ओढ दिल्यामुळे हलक्या व माळरानावरील खरीपाची सर्वच पीके करपून ती वाळून गेली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Latur Rain News: Crops begin to wither; Rena Dam holds only 21% water stock

रेणापूर : रेणापूर तालुक्यात मागील दोन महिण्यांपासुन पावसाने ओढ दिल्यामुळे हलक्या व माळरानावरील खरीपाची सर्वच पीके करपून ती वाळून गेली आहेत. तर काळ्या व चांगल्या जमिनीवरील पीकेही आता माना टाकीत आहेत. जवळपास या वर्षाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता मावळत आहे. आत्ता जरी पाऊस पडला तरी हि पीके जगु शकत नाहीत अशी अवस्था झाली आहे. रेणा मध्यम प्रकल्प वरचेवर कोरडा पडत असून सध्या केवळ २१ टक्केच धरणात जलसाठा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे.

डोळ्यादेखत वाळत असलेली पिकांची अवस्था शेतकऱ्यांना पाहवत नाही. कुटुंबाचा वर्षभराचा डोलारा चालवायचा कसा ? बँकेचे व खाजगी सावकारांचे कर्ज फेडायचे कसे ? रब्बीची पेरणी करावयाची कशी ? यासह अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. तसेच पावसाच्या सरासरीमध्ये मोठी घट झाल्याने रेणा मध्यम प्रकल्पात अवघा २१ टक्केच जलसाठी उपलब्द असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.

रेणा धरणातील पाणी सध्या पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आले आहे. धरणातून कोणीही सिंचनासाठी पाण्याचा उपसा करू नये असा इशारा प्रशासनाने दिला होता. तरीही कांहीं शेतकरी रात्री व दिवसा चोरून पाण्याचा उपसा करीत होते. अशा शेतकऱ्यांवर काही दिवसांपूर्वी तहसील, पोलीस व पाटबंधारे विभागाच्या पथकाने ९ वायरची बंडले, ५ स्टार्टर यासह इतर साहित्य जप्त केले आहे. धरणातून पाण्याचा उपसा होणार नाही याची दक्षता पथकाकडून घेतली जात आहे.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते रेणापूर तालुक्यातील रेणा नदी काढच्या अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पुरामुळे वाहून गेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते शासनाच्या नुकसान भरपाईची काहीना मदत मिळाली तर काही शेतकरी अद्यापही मदतीची प्रतिक्षा करीत आहेत.

मागील दोन महिन्यांपासुन पाऊस गायब झाल्याने खरीप पिकांबरोबरच फळांची झाडेही कोमेजली आहेत. बोअर व विहिरींचे पाणी कमी झाल्याने फळबागा जगवाव्यात कशा असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. कडक उन्हामुळे पाण्याची पातळीहि खालावत चालल्याने विहिरी - बोअर कोरडे पडत आहेत. रेणा मध्यम प्रकल्पात अवघा २१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे व्हटी प्रकल्प, इतर पाझर तलाव तसेच मांजरा व रेणा नदीवरील बॅरेजेस मधिल जलसाठा संपत त आला असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या भयान परिस्थितीमध्ये शेतकरी व सर्वसामान्य नागरिक दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी रेणापूर तालुका काँग्रेस, रेणापूर शहर कांग्रेस तसेच कांही संघटना शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावा म्हणून अनेक संघटनांकडून शासन व प्रशासनाला निवेदने देत आहेत. लातूर ग्रामीणसह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार , आमदार माजी आमदार व इतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

पाऊस पडावा म्हणून रेणापूर येथील अनेक महिला पुरुषांनी घागरीने पाणी आणून येथील अमृतेश्वर मंदिरातील महादेवाला जलाभिषेक करून महादेवाची पिंड पाण्याने बुजविली होती तसेच " हे देवा पाऊस पडु दे, पिके जगु दे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागु दे !" यासाठी खरोळा, रेणापूर येथील मुस्लीम बांधवांकडूनहि ईदगाह मैदानावर सामुहिक प्रार्थना करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्या पेक्षाही कडक ऊन असल्याने नागरिकांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT