

Stop water theft from the Manjara Dam; keep the administration prepared for water scarcity!
लातूर, पुढारी वृत्तसेवा अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा धरणासह अन्य प्रकल्पांमधून होणारा अवैध पाणी उपसा तातडीने रोखावा, तसेच लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधील पाणी चोरीवरही कठोर कारवाई करावी, असे निर्देशपालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला दिले. संभाव्य टंचाईच्या काळात शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच पूर्ण तयारी ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील, आमदारविक्रम काळे, अभिमन्यू पवार, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार संजय बनसोडे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांतील पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी विशेष पथके गठीत करून सातत्याने कारवाई करावी. महापालिका, महावितरण, पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवून मांजरा धरणातील अवैध पाणी उपसा तसेच जलवाहिन्यांमधील पाणी चोरी रोखावी, असे भोसले यांनी सांगितले. आगामी काळात सिंचन प्रकल्पातील मृत जलसाठा पिण्यासाठी वापरण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी आवश्यक कार्यवाही आतापासूनच सुरू करावी.
एखाद्या गावात पाणीटंचाई निर्माण झाल्यास तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असेही त्यांनी निर्देश दिले. अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक घेऊन नुकसानीची अचूक नोंद करावी आणि वस्तुस्थिती अहवालातून स्पष्टपणे मांडावी, असे पालकमंत्री म्हणाले.
जलवाहिन्यांची दुरुस्ती, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि काटकसरीने पाणी वापराबाबत जनजागृती करण्याची सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. आमदार विक्रम काळे यांनीही जलवाहिन्यांमधील पाणी चोरी रोखण्याची मागणी केली. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा आणि खरीप पिकांच्या सद्यस्थितीची माहिती सादर केली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी संभाव्य पाणीटंचाई आणि उपाययोजनांचा आढावा दिला.
चाऱ्याचे नियोजन करा : सहकार मंत्री पाटील
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. पशुसंवर्धन व कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करून चारा टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उदगीर व जळकोट तालुक्यांत डिसेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले. त्यानंतर टंचाई निवारणाच्या उपाययोजना कराव्या लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.