Latur Political News Jumbo entry into NCP ahead of elections
चाकूर, पुढारी वृत्तसेवा ऐन निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षामध्ये कार्यकत्यांचा जम्बो प्रवेश झाल्याने चाकूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र असले तरी सेफ झोनसाठी अनेकांचे पक्षांतर झाले असल्याची चर्चा होत आहे.
रविवारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लातूर येथील एका कार्यक्रमात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चाकूर तालुक्यातील विविध गावांतील विद्यमान सरपंच, विविध पक्षांतील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाला. जुलै महिन्यात प्रहारचे नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्यावर अविश्वास दाखल झाला त्यानंतर त्यांनी आणि मार्केट कमिटीचे सभापती नीलकंठ मिरकले यांनी आपल्या समर्थकासोबत भाजपात प्रवेश केला.
तालुक्यात एकीकडे भाजपा आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मजबूत होत चाललेला आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी सेफ झोनसाठी आपल्या सोयीने पक्षांतर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी युतीच्या विर ोधात काम केलेल्यांना प्रवेश देण्यात आल्यामुळे याचा आगामी निवडणुकीत फायदा होईल की तोटा याचीच चर्चा राजकीय जानकारातून होत आहे.
काँग्रेसचे नगरसेवक भागवत फुले, गंगुबाई नरसिंग गोलावर, प्रहारच्या नगरसेविका शुभांगी रामेश्वर कसबे, शाहीन बानू सय्यद, रोहिणाचे उपसरपंच मच्छिंद्र नागरगोजे यांच्यासह जानवळ, आटोळा, म रंबी, बोळेगाव, कवनसांगवी, महाळंग्रावाडी, जगळपूर, मोहनाळ, अजनसोंडा (खुर्द), हनमंतवाडी, आटोळा आदी गावच्या सरपंचांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर हा प्रवेश ही कोणासाठी धोक्याची घंटा ठरते हे पाहणे गरजेचे आहे. जो तो कार्यकर्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत असल्याचे चित्र आहे. पुन्हा राजकारणात ढवळाढवळ झाल्यास या कार्यकत्यांची ना इधर, ना उधर अशी अवस्था होणार तर नाही ना ?
विधानसभा निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करून प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विजयासाठी घरोघर फिरणाऱ्या कार्यकर्त्याला, समर्थकांना पक्ष प्रवेश दिला असून पक्षासाठी राबणारे जुने पदाधिकारी, कार्यकर्ते उपेक्षीत राहतील का ? अशीही चर्चा होत आहे.