

Latur district is leading in the Chief Minister's Solar Agricultural Channel Scheme
लातूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीत लातूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात ३६ सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण झाली आहे.त्याद्वारे सुमारे १७३ मेगावॉट विजेची निर्मिती होत असून जिल्हा प्रशासन आणि महावितरणच्या समन्वित प्रयत्नांमुळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह महावितरणच्या अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीसाठी लोकेश चंद्र लातूर येथे आले होते. लातूर शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवणे, संचालक सचिन तालेवार, राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, प्रसाद रेशमे, लातूरचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्यासह विभागातील सर्व अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात जास्तीत जास्त सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महावितरणच्या जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने प्रयत्न केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी प्रकल्पांसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गतिमान केली.
त्यामुळे डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या सात महिन्यांच्या कालावधीत ३६ प्रकल्प पूर्ण झाले असून, त्याद्वारे सुमारे १७३ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. यामुळे परिसरातील सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. लातूर जिल्ह्यातील या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल लोकेश चंद्र यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.