लातूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला १० लाखांहून अधिक किमतीचा सुगंधित जर्दा विक्रीसाठी वाहतूक करताना लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. ताजोदीन बाबा दर्गा परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत जर्द्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे टाटा एसीई गोल्ड वाहन असा एकूण १३ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच वाहनातील दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
२५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.१० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना, ताजोदीन बाबा दर्गा ते ताजोदीन बाबा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रतिबंधित सुगंधित जर्द्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या मार्गावर सापळा रचला.काही वेळातच एमएच २४ एयू ८६३३ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे टाटा एसीई गोल्ड वाहन तेथे आले.
पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा करताच चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले आणि त्याच्यासोबत असलेल्या जुनेद साबेर सिद्दीकी (रा. लेबर कॉलनी, लातूर) याच्यासह पळ काढला.पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, पिवळ्या रंगाच्या पोत्यांमध्ये विविध कंपन्यांच्या नावांची लेबले असलेला प्रतिबंधित सुगंधित जर्दा आढळला.
पोलिसांनी जर्दा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त केले. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्र, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, मनोज खोसे आणि प्रवीण कोळसुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.