लातूर पोलिस भरतीचा थरार सुरू!  pudhari photo
लातूर

Latur police recruitment : लातूर पोलिस भरतीचा थरार सुरू!

पहिल्याच दिवशी 213 उमेदवारांची मैदानी चाचणी; पारदर्शकतेवर प्रशासनाचा भर

पुढारी वृत्तसेवा

लातूर : लातूर जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 46 पदांसाठीच्या भरती प्रक्रियेचा आज, 11 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिस मुख्यालय येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. भरतीच्या पहिल्याच दिवशी 213 उमेदवारांनी हजेरी लावत मैदानी चाचणीत आपला घाम गाळला. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या थेट देखरेखीखाली ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सुनियोजित पद्धतीने राबवली जात आहे.

लातूर पोलिस दलात पोलिस शिपाई (30 पदे) आणि चालक पोलिस शिपाई (16 पदे) अशा एकूण 46 जागांसाठी ही भरती होत आहे. ही प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणार असून, यामध्ये पात्र उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.

भरती प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी तांत्रिक साधनसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. प्रत्येक इव्हेंटचे चित्रीकरण केले जात आहे. शारीरिक क्षमता तपासणीसाठी आधुनिक यंत्रणा वापरली जात आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण स्वतः मैदानावर उपस्थित राहून प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या तरुणांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. लांबून येणाऱ्या उमेदवारांसाठी पोलिस मुख्यालयातील नटराज रंगमंदिर येथे तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे.

मैदानावर तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक तैनात आहे. पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी मंडप आणि स्वच्छतागृहांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

उत्तेजक औषधांचा वापर केल्यास उमेदवारी रद्द

पोलिस प्रशासनाने उमेदवारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ही भरती पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असून कोणत्याही मध्यस्थाला किंवा आर्थिक आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, कामगिरी वाढवण्यासाठी कोणत्याही उत्तेजक औषधांचा वापर केल्यास संबंधित उमेदवारावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल, असा सज्जड दमही देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT