लातूर : गुन्हे तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत लातूर जिल्हा पोलिस दलाने डिजिटल पोलिसिंगमध्येही ‘लातूर पॅटर्न’ निर्माण केला आहे. ई-साक्ष्य आयडी तयार करून ते संबंधित गुन्हे व एफआयआरशी लिंक करण्याच्या कामात लातूर जिल्ह्याने तब्बल ९९.९८ टक्के कामगिरी नोंदवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून (एनसीआरबी) प्राप्त माहितीतून ही कामगिरी समोर आली आहे.
लातूरच्या पाठोपाठ सिक्कीममधील एका जिल्ह्याने द्वितीय, तर हरयाणातील रेवारी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. जवळपास शंभर टक्के कामगिरीमुळे डिजिटल पुराव्यांच्या व्यवस्थापनात लातूर पोलिसांनी राष्ट्रीय पातळीवर आपली कार्यक्षमता अधोरेखित केली आहे.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील छायाचित्रे, व्हिडिओ तसेच अन्य डिजिटल पुरावे अधिकृत पद्धतीने नोंदवून त्यांना स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक देण्याची प्रक्रिया ई-साक्ष्य प्रणालीद्वारे केली जाते.
हा ई-साक्ष्य आयडी संबंधित गुन्हा किंवा एफआयआरशी जोडल्यामुळे पुराव्याचे डिजिटल व्यवस्थापन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होण्यास मदत होते. न्यायालयीन प्रक्रियेतही या नोंदी महत्त्वपूर्ण ठरतात. तंत्रज्ञानाचा स्वीकार, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि अधिकारी-अंमलदारांच्या टीमवर्कच्या जोरावर लातूर पोलिसांनी डिजिटल पोलिसिंगमध्ये देशात हे अव्वल स्थान मिळविले आहे.
ई-साक्ष्य आयडी निर्मिती, लिंकिंग म्हणजे काय?
ई-साक्ष्य प्रणालीत गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील फोटो, व्हिडिओ व अन्य डिजिटल पुरावे अधिकृतरीत्या नोंदवून त्यांना स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक (एसआयडी) दिला जातो. हा क्रमांक संबंधित गुन्हा किंवा एफआयआरशी जोडला जातो. त्यामुळे डिजिटल पुराव्याची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि पारदर्शकता राखण्यास मदत होते.
समन्वय कामी
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार ई-साक्ष्य आयडी निर्मिती व लिंकिंगच्या कामाला जिल्ह्यात प्राधान्य देण्यात आले. सर्व पोलिस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांकडून हे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करून घेण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या संपूर्ण प्रक्रियेचे सातत्याने मॉनिटरिंग केले. कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा, आवश्यक सूचना आणि अधिकारी-अंमलदारांशी समन्वय यामुळे हे काम प्रभावीपणे पूर्ण झाले.