Manjara Terna river danger level
निलंगा : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन दिवस मांजरा व तेरणा नदीचा ओसरलेला पूर पुन्हा आला असून दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर कासार शिरसी मार्गे लिंबाळावरून जाणारा राज्यमार्ग पुन्हा एकदा सकाळी बंद झाला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रात्रभर संतदार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस होत असल्यामुळे सध्या जमिनीवर पडणारा पाऊस वाहून जात आहे. तालुक्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाले आहेत. मागील तीन दिवसांपूर्वी मांजरा व तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता.
धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणातून पाणी बंद केल्यामुळे पूर ओसरला होता. मुसळधार पाऊस रात्रभर झाल्याने प्रकल्पातून पाणी नदीपात्रात सोडले आहे. त्यामुळे मांजरा नदीवर पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर निम्नतीरणा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने तेरणा नदीला पूर आला आहे यामुळे कोकळगाव, मदनसुरी, लिंबाळा जाणारा रस्ता बंद झाला. यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे.
जिल्हाअंतर्गत अनेक पूल पाण्याखाली गेली आहेत रात्रभर पाऊस सुरूच आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे.रात्रभर तर पाऊस सुरू आहे परंतु सध्याही पावसाची उघडीप नाही यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तालुक्यातील अनेक जुन्या घरांची ग्रामीण भागात पडझड झाली असून ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यामुळे पाऊस किती दिवस राहणार असा प्रश्न शेतकऱ्यातून विचारला जात असून उभ्या पिकाला सततच्या पावसामुळे कोंबारे फुटू लागले आहेत.रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उसाचे मोठे नुकसान झाले असून हंगामी महिन्यामध्ये लागवड केलेल्या उसाचे आडवा पडून नुकसान होणार आहे. या रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रस्ते बंद झाले असून बंद झालेल्या रस्त्यामुळे काही गावाचा संपर्क तुटला आहे.