दगडगाव पाझर तलावाचा सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग वाढविला Pudhari
लातूर

Nilanga Rain | धोका टाळण्यासाठी दगडगाव पाझर तलावाचा सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग वाढविला

निलंगा पाटबंधारे विभागाची दक्षता

पुढारी वृत्तसेवा

Dagadgaon Pazar lake

निलंगा : शहरालगतच्या दापका ग्रामपंचायत हद्दीतील दगडगाव मुबारकपूर पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला होता . हवामान खात्याने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने निलंगा लघु पाटबंधारे विभागाने तातडीने पाझर तलावाचा सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग वाढविला. त्यामुळे पाझर तलावा खालील जमिनीला व निलंगा शहरातील निवासी वस्तीला होणारा संभाव्य धोका टाळण्यात यश आले आहे.

1972 च्या दुष्काळात लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेवरून शहरालगतच्या निलंगा हाडगा रोडवर दगडगाव हद्दीत या पाझर तलावाचे काम पूर्ण करण्यात आले. या पाझर तलावामुळे शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्यासोबतच निलंगा शहराच्या पश्चिमेकडील निवासी वस्तीला पाण्याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. त्यामुळे शिवाजीनगर, दत्तनगर या निवासी वस्तीमध्ये अवघ्या तीस ते चाळीस फुटाच्या खोलीवर विंधन विहिर व विहीरीला पाणी लागते.

यंदाच्या सततच्या पावसामुळे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू होता. शुक्रवार दि 26 सप्टेंबर रोजी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात रात्रभर पाऊस झाल्याने पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागले. तलावा शेजारील शेतकरी शिवप्पा गुंडप्पा फुलारी यांनी याबाबतची माहिती दापका ग्रामपंचायतचे सरपंच लाला पटेल यांना दिली. लाला पटेल यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. शनिवारी सकाळी लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी सरपंच लाला पाटील व ग्रामपंचायत सदस्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होवून पाझर तलावाची पाहणी केली असता दगडगाव मुबारकपूर पाझर तलाव शुक्रवारी रात्रीच्या सततच्या मोठ्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून सांडव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू होते.

तलावाच्या मध्यभागी पाण्याची पातळी दगडी भिंतीच्या वर चार-पाच फूट म्हणजे पाळू लेवल पेक्षा दोन तीन फूट कमी असल्याने येत्या दोन-तीन दिवसात हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने तलावाखालील जमिनीला व निलंगा शहरातील निवासी वस्तीला संभाव्य धोका होऊ नये म्हणून सांडव्याची भिंत अंदाजे दहा फूट लांबीची तीन फुटांपर्यंत फोडून कमी करून पाण्याचा विसर्ग वाढविला.

यावेळी निलंगा लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस एस कुलकर्णी, शाखा अभियंता श्रीमती राऊ धुमाळ, दापका चे सरपंच लाला पाटील, ग्रामपंचायत सदस्य बबलू जाधव, अंकुश भोपी, बाळासाहेब देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष बबरू पठाण, जावेद शेख, अलीम शेख, राजू शेंडगे, राहुल घोडके, ताजोद्दीन पटेल आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT