

लातूर: जिल्ह्यातील मुरुड अकोला येथे सौम्य भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच अगदी दुसऱ्या दिवशीच बुधवारी (दि.24) साधारणपणे रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान निलंगा तालुक्यातील हासोरी, बडूर, उस्तुरी या गावात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने यास दुजोरा दिला असून, 2.4 रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाली असल्याची माहिती आहे.
उपरोक्त गावांना धक्के बसले असता याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राला कळविण्यात आली होती. परंतु त्यांनी प्रारंभी याची नोंद झाली नसल्याचे सांगितले होते. तथापि त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कलबुर्गी, सोलापूर, नांदेड, लातूर इ स्थापित भूकंप मापक यंत्रावर पुनश्च तपासणी करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेने सिस्मोलॉजिकल डेटा तपासला असता 2.4 रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाली असल्याचे रात्री 11.40 कळवले. भूकंपाचा हा धक्का सौम्य असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यात 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारीत प्रलयंकारी भूकंप झाला होता. तेव्हापासून अधून मधून लातूर ,औसा, निलंगा तालुक्याला भूकंपाचे सौम्य धक्के बसतच आहेत. 30 सप्टेंबरच्या त्या काळा रात्रीच्या आठवणी अजूनही नागरिकाच्या मनात ताज्या आहेत. हा महिना आला की एक अनामिक भय या परिसरातील नागरिकाच्या मनात दाटते. सध्या सुरू असलेला सप्टेंबर महिना व जवळ येत असलेली तीस तारीख यामुळे 93 च्या भूकंपाचा तो थरार नागरिकांच्या नजरेसमोर येत आहे.