Latur News: Network Down for Five Days
औसा, पुढारी वृत्तसेवाः औसा तालुक्यातील आलमला परिसरात गेल्या पाच दिवसांपासून जिओ नेटवर्क पूर्णपणे गायब झाल्याने हजारो ग्राहकांना मोठ्या मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अचानक नेटवर्क बंद पडल्यामुळे मोबाईल सेवा पूर्णतः ठप्प झाली असून नागरिकांच्या दैनंदिन कामांवर याचा गंभीर परिणाम झाला असून मोबाईल ही फक्त शोभेची वस्तू बनून राहिल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
आलमला व परिसरातील मोठ्या संख्येने ग्राहक जिओ सेवा वापरत आहेत. मात्र मागील पाच दिवसांपासून मोबाईलमध्ये नेटवर्कच दिसत नसल्याने कॉल, इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, व्यापाऱ्यांचे व्यवहार तसेच शासकीय कामकाजही विस्कळीत झाले आहे.
विशेष म्हणजे, अनेक ग्राहकांनी वर्षभराचे रिचार्ज केल्यामुळे ते इतर नेटवर्कमध्ये पोर्टही करू शकत नाहीत. त्यामुळे ग्राहक अक्षरशः अडचणीत सापडले असून मोबाईल 'शोभेची वस्तू' बनल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिओ नेटवर्क मिळत नसल्याने त्रस्त अनेक ग्राहकांनी ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला असता, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा केला जात असल्याने ग्राहकात नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित कंपनीने तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन नेटवर्क सेवा पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.