

जिंतूर : शहरात वीज ग्राहकांच्या घरांमध्ये नवीन स्मार्ट (डिजिटल) मीटर बसविण्याच्या कामावरून नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. एका खासगी कंपनीमार्फत हे स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून नागरिकांच्या संमतीशिवाय बळजबरीने मीटर बसवले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकाराविरोधात संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत ही कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक वीज ग्राहकांना अवाजवी वीज बिल येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, मजूर तसेच मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वीज बिल जास्त आल्यास ते तात्काळ भरता न आल्यामुळे संबंधित ग्राहकांचा वीज पुरवठा रिमोट प्रणालीद्वारे अचानक खंडित केला जात असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बिल भरल्यानंतरही अनेकदा १० ते १२ दिवसांनीच वीज पुरवठा पूर्ववत केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने वीज खंडित झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, स्मार्ट मीटर बसविण्याचे काम काही स्थानिक कंत्राटदारांमार्फत केले जात असून काही कंत्राटदार आर्थिक फायद्यासाठी नागरिकांवर दबाव टाकत असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार कोणालाही स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करता येत नसतानाही संबंधित कंपनीकडून या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोलर प्लांट बसवलेल्या ग्राहकांनाही स्मार्ट मीटरमुळे अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलर प्लांट असूनही अपेक्षितप्रमाणे बिल कमी न होता उलट जादा बिल येत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर जिंतूर शहरात बळजबरीने स्मार्ट मीटर बसविण्याची कारवाई तात्काळ थांबवावी, अवाजवी वीज बिलांची चौकशी करावी आणि रिमोट पद्धतीने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सोलर प्लांट असूनही आठ हजारांचे बिल “पूर्वीचे मीटर जास्त बिल देत होते म्हणून एप्रिल २०२४ मध्ये स्मार्ट मीटर घेऊन सोलर प्लांट बसवला. मात्र आठ हजार रुपयांचे बिल आले आणि वीज पुरवठाही बंद करण्यात आला. सोलर प्लांट असल्यामुळे बिल कमी येणे अपेक्षित असताना उलट जादा बिल आले. कार्यालयात चौकशी केली असता ‘बिल वरून आले आहे, भरल्याशिवाय वीज सुरू होणार नाही’ असे सांगण्यात आले. बिल कसे आले याबाबत समाधानकारक उत्तर मिळत नाही.”
कैलास जाधव, सोलर ग्राहक, ग्रीन पार्क, जिंतूर
लोन काढून सोलर बसवला; तरी बिल कमी नाही “सोलर प्लांट बसवून चार महिने झाले. बिल कमी होईल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. चार हजार रुपयांचे बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा बंद केला. बँकेतून कर्ज घेऊन एक लाख ७८ हजार रुपये गुंतवणूक केली आहे. त्याचे हप्तेही भरत आहे, तरीही बिल कमी होत नाही. त्यामुळे काय करावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.”
संदीप भांबळे, सोलर ग्राहक, बामणे प्लॉट, जिंतूर
राज्यात बहुतांश नागरिक मोलमजुरीवर जगणारा आहे. पण सध्या राज्यातील महावितरण संस्थेने सर्वसामान्य वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. बहुतांश ग्राहकाचे घरगुती स्मार्ट मीटर हे फाल्टी मीटर असल्याने घरगुती विज बिल वापरापेक्षा जास्तीचे बिल आल्याने सर्वसामान्य नागरिकांची मार्चमध्ये वओढाताण होत आहे. कष्टाने कमविलेली मजुरी जास्तीच्या बिलाच्या माथी मारावी का असा प्रश्न सर्व सामान्य वीज ग्राहक करत आहेत. शहरातील कित्येक ग्राहकांचे सदोष मीटर असल्याने वापरा पेक्षा चुकीचे अव्वाच्या सव्वा आलेले लाखाचे बिल मीटर चेक करून पुन्हा कमी केल्याचे अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. या सर्व प्रक्रियेत वीज ग्राहकांची ओढाताण आणि वेळ वाया जात असून मनस्ताप होत आहे.