Latur News : निधीमुळे जि.प. कन्या शाळेचे बांधकाम रखडले file photo
लातूर

Latur News : निधीमुळे जि.प. कन्या शाळेचे बांधकाम रखडले

चाकूर : २९ महिने उलटले तरीही बांधकाम अपूर्णच; शाळेचा पहिला दिवस, पालकांतून तीव्र नाराजी

पुढारी वृत्तसेवा

Latur News: Due to the funds, the Z.P. The construction of girls' school was stopped

संग्राम वाघमारे

चाकूर : येथील जिल्हा परिषद कन्या शाळेचे बांधकाम निधीमुळे रखडले असून तब्बल २९ महिने उलटूनही ते बांधकाम अपूर्ण स्थितीत असल्यामुळे विद्यार्थिनींचे नव्या इमारतीत शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण कथी होईल असा संतप्त सवाल पालकांतून विचारला जात आहे. जि. प. कन्या शाळेची स्थापना १९४१ ला झाली आहे. शाळा जीर्ण झाल्याने जुलै २०२२ रोजी शासनाच्या राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता अभियानांतर्गत नवीन इमारत बांधकामासाठी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

शाळेचे बांधकाम जानेवारी २०२४ मध्ये प्रत्यक्ष सुरू झाले. कंत्राटदराने शाळा बांधकाम १५ जून २०२४ शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु कंत्राटदाराचा ढिसाळ कारभार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळे कामाला गती मिळण्याऐवजी संथ गतीने काम केल्याचा फटका शाळेला बसला आहे.

आजपर्यंत शाळेचे बांधकाम पूर्ण होऊन विद्यार्थिनींना नव्या इमारतीमध्ये शिक्षण घेणे सुलभ झाले असते मात्र सद्यस्थितीत पहिला मजला तयार झाला आहे. दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पडला असून वीट बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. पुढील बांधकाम पूर्ण होण्यासाठी शासनाकडे निधी नसल्याने काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे.

शासनाकडे निधी उपलब्ध होत नसेल तर शाळेच्या बांधकामास निधी कधी मिळणार आणि बांधकाम कधी पूर्ण होणार याचा विचार न केलेलाच बरा, अशा तीव्र शब्दात शिक्षक व पालक वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. शाळेच्या बांधकामास निधी उपलब्ध असताना कंत्राटदाराने मनमानी करीत बांधकामाकडे लक्ष न देता हलगर्जीपणा केला.

ते काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेही त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळेचे कन्या शाळेतील विद्यार्थिनींना नवीन इमारतीमध्ये शिक्षण मिळण्यास मोठे अडथळे निर्माण होत आहेत. दुसऱ्या वर्षाच्या २०२५ शैक्षणिक वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही ते काम २०२६ मध्ये अडीच वर्षानंतर सुद्धा पूर्ण होऊ शकले नाही.

याला जबाबदार कोण, असा सवाल पालक व नागरिकांनी विचारला आहे. यावर्षी तरी बांधकाम पूर्ण होईल आणि विद्यार्थिनींना नवीन इमारतीत शिक्षण घेता येईल असे वाटत नाही. अजून किती दिवस यासाठी जातील हे सांगणे कठीण असून या शाळेच्या बांधकामास लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देवून राहिलेले बंधकाम पूर्ण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे यांच्याशी संपर्क केला असता निधी नसल्यामुळे बांधकाम रखडल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद कन्या शाळेचे बांधकाम हे निधीमुळे अर्ध्यात लटकले असून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शाळेला उर्वरित निधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

जि.प. कन्या शाळेच्या उर्वरित बांधकामास निधी नाही. निधी उपलब्ध झाल्यानंतरच शाळेचे राहिलेले काम पूर्ण होणार आहे.
- विजय वलांडे, कार्यकारी अभियंता, समग्र शिक्षा अभियान, लातूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT