Crime News pudhari photo
लातूर

Latur Crime : बालिकेचा विनयभंग; आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास

चाकूर पोलिसांच्या तपासाला यश; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

लातूर : दहा वर्षीय बालिकेसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी गोविंद साधू नाईकवाडे (वय ५०, रा. उजळंब, ता. चाकूर) यास अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक ३, लातूर यांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी ६ ऑक्टोबर रोजी हा निकाल दिला.

२१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी चारच्या सुमारास चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. पीडित बालिका घरात खेळत असताना आरोपीने घरातील खोलीत प्रवेश केला. बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकून आई व घरातील इतर व्यक्तींनी धाव घेत तिची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यातील कलम ८ व १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून पुरावे व साक्षीदारांच्या आधारे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. विशेष सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्त्ता मंगेश महिंद्रकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार चंद्रकांत राचमाळे व प्रमोद तरडे यांनी काम पाहिले. ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहाय्यक पो. नि. शिवशंकर मनाळे यांनी पो. नि. बालाजी भंडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन प्रक्रियेत समन्वय साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT