

लातूर : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची जमीन सावकारांनी बळकावली; मात्र यंदाच्या दिवाळीत दोन शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचा नवा प्रकाश उजळला. मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जापोटी जमीन गमावलेल्या मंडुबाई डावरे आणि आर्थिक विवंचनेत जमीन गमावलेल्या वामन सूर्यवंशी यांना प्रशासनाच्या कारवाईमुळे त्यांची हक्काची जमीन पुन्हा मिळाली. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते गुरुवारी दोन्ही शेतकऱ्यांना जमिनीचे सातबारे सुपूर्द करण्यात आले. अवैध सावकारीविरोधात जिल्हा प्रशासनाने उघडलेल्या मोहिमेमुळे दोन कुटुंबांना दिवाळीची अनमोल भेट मिळाली आहे.
चाकूर तालुक्यातील कलकोटी येथील मंडुबाई इराप्पा डावरे यांनी मुलीच्या लझासाठी सावकार किसन गोविंद अलमले यांच्याकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या हमीपोटी सावकाराने त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत शेतजमिनीचे खरेदीखत करून घेतले. सहकार विभागाच्या चौकशीत हा व्यवहार सावकारी कर्जासाठी घेतलेली हमी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खरेदीखत रद्द करून मंडुबाई यांना एक हेक्टर ८० आर जमीन परत देण्यात आली. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
निलंगा तालुक्यातील थोर माकणी येथील वामन श्रीपती सूर्यवंशी यांचीही आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन जमीन सावकाराने स्वतःच्या आणि नंतर अन्य व्यक्तीच्या नावावर केली होती. सावकार शरद दिगंबर पाटील यांच्याशी झालेल्या व्यवहाराची जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी केली असता बेकायदेशीर सावकारीचा प्रकार उघड झाला. त्यानंतर संबंधित खरेदीखत रद्द करून सूर्ववंशी यांनाही जमीन परत मिळवून देण्यात आली.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १८ (२) च्या तरतुदींचा वापर करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले यांनी ही कारवाई केली. जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात आतापर्यंत १४५ तक्रारी प्राप्त झाल्या असून, ६६ प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १४ प्रकरणांत तथ्य आढळले असून, आठ व्यक्तींविरुद्ध कलम ३९ अन्वये विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित तक्रारींची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ३७३ परवानाधारक सावकारांनी ३ हजार ५३४ जणांना १९ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. या सर्व व्यवहारांची तपासणी करून नियमबाह्य कर्जवाटप किंवा शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे का, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आर्थिक विवंचनेचा गैरफायदा घेऊन जमीन बळकावण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी न घाबरता सहकार विभागाकडे तक्रार करावी. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले.
सातबारा आला अन् दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला
शेतकऱ्यासाठी जमीन म्हणजे केवळ मालमत्ता नसते, तर ती त्याच्या जगण्याचा आधार असते. याच जमिनीतून संसार चालतो आणि भविष्याची स्वप्ने फुलतात. कर्जाच्या बदल्यात हीच जमीन हातातून गेल्यानंतर दोन शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा हक्काची जमीन नावावर झाली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मिळालेला सातबारा म्हणजे केवळ कागदपत्र नव्हे, तर पुन्हा सन्मानाने जगण्याचा आणि नव्याने उभे राहण्याचा विश्वास ठरला आहे.
नऊ जणांवर गुन्हे
जिल्ह्यात १४५ तक्रारी प्राप्त झाल्या असून, ६६ प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १४ प्रकरणांत तथ्य आढळले आहे. याप्रकरणी बालुरे पिराजी बाबुराव (उदगीर), आदिल मदारसाब शेख (खोरी गल्ली लातूर), फारुक उस्मानसाब सय्यद (आलमपूरा), सौरन अशोककुमार गर्ग (हत्ते नगर, लातूर), तुकाराम इस्माईल वजनम (निलंगा), बिबीता ऊर्फ कविता बालाजी शिंदे (खाडगाव रोड, लातूर), काशिनाथ हणमंतराव म्हेत्रे (नाईक चौक, लातूर), संतोष रावसाहेब उपाडे (बार्शी रोड, लातूर) आणि पांडुरंग सिद्राम सूर्यवंशी (जुना बाभळगाव रोड, लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित तक्रारींची चौकशी सुरू आहे.