लातूर : परभणी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरांची निवड नऊ फेब्रुवारी रोजी करण्याचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी काढला आहे. याच धरतीवर लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरांच्या निवडीचा कार्यक्रम लागू शकतो.
लातूर शहर महानगरपालिकेत 70 जागांसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होऊन काँग्रेसने (वंचित बहुजन आघाडीसह) 47 जागा जिंकत बहुमत मिळविले आहे. भाजप 22 जागा जिंकून विरोधी बाकावर बसणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एका जागेवर विजयी झाली आहे.
19 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निकाल गॅजेटमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तर विभागीय आयुक्तांकडून गट नोंदणीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी परभणी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम 9 फेब्रुवारी रोजी लावला आहे. लातूरच्या महापौर व उपमहापौरांच्या निवडीसाठी याच दिवशी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करून कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
आज निघणार निवडणुकीचा अजेंडा
लातूर महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयामार्फत नवनिर्वाचित सदस्यांना महापौर व उपमहापौर निवडीचा अजेंडा (निवडणूक कार्यक्रम) पाठविला जावू शकतो. महापौर व उपमहापौरांच्या निवडणुकीसाठी अर्ज विक्री दोन किंवा तीन फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्यानंतर निवडीच्या आधी तीन दिवस अर्जांची स्वीकृती होईल. 9 फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजेपूर्वी छाननी होईल आणि त्याचवेळी निवडणूक प्रक्रिया राबविली जाईल, असे मनपाच्या सूत्रांनी सांगितले.
मनपा गटनेतेपदी काँग्रेसचे विजय साबदे
लातूर महानगरपालिकेत बहुमत मिळविलेल्या काँग्रेसच्या गटनेतेपदी विजयकुमार साबदे यांना संधी दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची गट नोंदणी 27 जानेवारी रोजी करण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त राजेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या बंद लिफाफ्यात विजयकुमार साबदे यांचे गटनेते म्हणून नाव निघाले. हा बंद लिफाफा आ. अमित देशमुख यांनी पाठविला होता.