Latur Crime pudhari photo
लातूर

Latur Crime : सोयाबीन चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; ८ गुन्हे उघड

लातूरचे सहा, कर्नाटकातील दोन गुन्हे उघडकीस; ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

लातूर : शेतशिवारातून सोयाबीन चोरी करून शेतकऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या आणि कर्नाटकात गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. लातूर जिल्ह्यातील सहा आणि कर्नाटकातील दोन अशा आठ चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत तिघांना अटक करून ३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील एक आरोपी तब्बल १५ चोरीच्या गुन्ह्यांत पाहिजे होता.

लालू ऊर्फ प्रदीप माधव कांबळे (वय २६, रा. बसपूर, ता. निलंगा) याच्यासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत लातूर जिल्ह्यातील देवणी, कासारशिरसी, उदगीर ग्रामीण, रेणापूर आणि औराद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून सोयाबीन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील हुलसूर परिसरातून गॅस सिलिंडर चोरी केल्याचेही उघड झाले.

पोलिसांनी आरोपींकडून सोयाबीन विक्रीतून मिळालेले २ लाख ७६ हजार रुपये, चोरीसाठी वापरलेली फोर्ड फिगो कार (७० हजार रुपये) आणि चोरीचे १५ गॅस सिलिंडर (३१ हजार रुपये), असा एकूण ३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विशेष म्हणजे, लालू ऊर्फ प्रदीप कांबळे हा लातूरसह धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या १५ चोरीच्या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध लातूर ग्रामीण, रेणापूर, मुरुड, आनंदनगर, एमआयडीसी लातूर, उदगीर ग्रामीण, किल्लारी, भादा आणि गातेगाव आदी पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.तिन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह देवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT