Beed Drought : दुष्काळाने शेतकरी मृत्यूच्या दारात; प्रशासन मात्र सुस्त!

अवघ्या २४ तासांत दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पाण्यासाठी वणवण, मदतीच्या घोषणा हवेतच
Water Scarcity Beed
Beed Droughtpudhari photo
Published on: 
Updated on: 

बीड : बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना शेतकऱ्यांच्या आयुष्याचा मात्र अक्षरशः अंत होताना दिसत आहे. पाण्याची टंचाई, हाताला काम नाही, शेतीतून उत्पन्न नाही, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा संकटांच्या कात्रीत अडकलेल्या शेतकऱ्यांचा जगण्याचा संघर्ष असह्य होत चालला आहे. याच भयावह परिस्थितीचे विदारक चित्र मंगळवारी पुन्हा समोर आले.

गेवराई तालुक्यातील सिरसमार्गजवळच्या भंडगवाडी येथील ५६ वर्षीय शेतकरी बाबुराव रंगनाथ वाघमोडे यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. विशेष म्हणजे, अवघ्या २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आत्महत्येमागील नेमकी कारणे तपासातून स्पष्ट होतील; मात्र दुष्काळी संकटाने ग्रामीण भागातील जगणे किती कठीण केले आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

Water Scarcity Beed
Sambhajinagar Property Tax Collection : मालमत्ता कर वसुलीतून मनपाने ओलांडला शंभर कोटींचा टप्पा

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. शेतातील पिके जळून गेली, विहिरींनी तळ गाठला, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आणि रोजगारासाठी शेतमजुरांसह शेतकरी कुटुंबांनाही ऊसतोडीसाठी स्थलांतर करावे लागत आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या हातात उत्पन्नाचे साधन उरलेले नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

मात्र, या संकटावर मात करण्यासाठी शासनाकडून जाहीर होणाऱ्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, हा मोठा प्रश्न आहे. दुष्काळी उपाययोजनांच्या घोषणा होतात, बैठका होतात, आढावा घेतला जातो; परंतु प्रत्यक्ष गावपातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का? पाणी, चारा, रोजगार आणि आर्थिक मदत वेळेत मिळते का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत. काही योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता आणि निधीच्या गैरवापराच्या तक्रारीही समोर येत आहेत.

शेतकऱ्यांसाठी आलेल्या धान्यापासून ते विविध शासकीय योजनांच्या निधीपर्यंत अनेक ठिकाणी लाभार्थ्यांऐवजी अधिकारी-कर्मचाऱ्यांचेच हित जपले जात असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे.दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश आहे की नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. गावागावांतील परिस्थिती काय आहे, शेतकऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, शासकीय मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते की नाही, याची नियमित पाहणी होणे अपेक्षित असताना प्रशासनावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच निष्क्रिय असल्याचे चित्र दिसत आहे.

Water Scarcity Beed
Nanded Sand Mining Raid : गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड पोलिसांची धडक कारवाई

लोकप्रतिनिधी राजकीय कार्यक्रम आणि इतर कामांमध्ये व्यस्त असताना सामान्य शेतकरी मात्र मदतीच्या प्रतीक्षेत दिवस काढत आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर कठोर नियंत्रण नसल्याने काही ठिकाणी मनमानी कारभाराला मोकळे रान मिळाल्याची भावना जनतेत वाढत आहे.अजून किती शेतकऱ्यांचे बळी गेल्यावर शासनाला जाग येणार? हा प्रश्न आता दुष्काळग्रस्त भागातून संतप्तपणे विचारला जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ आकडेवारीत नोंदवून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. प्रत्येक आत्महत्येमागील परिस्थिती समजून घेणे, कुटुंबाला आधार देणे आणि इतर शेतकऱ्यांना अशा टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

संतप्त शेतकऱ्यांचा सवाल : घोषणा नकोत

"आम्ही शेती करायची तरी कशाच्या भरवशावर? पाऊस नाही, विहिरीत पाणी नाही, पिके हातची गेली, जनावरांना चारा नाही. कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? शासनाकडून मदतीच्या घोषणा केल्या जातात; पण प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत शेतकऱ्यांची वेळ निघून गेलेली असते. आत्महत्यांची संख्या वाढल्यानंतर केवळ पंचनामे आणि चौकशा करून काय उपयोग? शेतकरी जिवंत असताना त्याला मदत मिळाली पाहिजे. आता तरी सरकारने जागे व्हावे," अशी संतप्त भावना दुष्काळग्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहेत.

प्रशासनावर अंकुश ठेवणार कोण?

"जिल्ह्यात सामान्य माणसाचे प्रश्न ऐकून घेणारी यंत्रणा कुठे आहे? पाणी, रेशन, रोजगार आणि शासकीय मदतीसाठी नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. योजनांचा पैसा आणि धान्य गरजूंपर्यंत पोहोचण्याऐवजी त्यातच गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येतात. अधिकारी काय करतात, यावर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण असायला हवे. मात्र, सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडे वेळ आहे, असा प्रश्न पडतो. दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनंतर तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जबाबदारी स्वीकारावी," अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.