Latur Sanitation Workers Protest  pudhari photo
लातूर

Latur Sanitation Workers Protest : पगार नाही, बोनस नाही; घंटागाडी सफाई कामगारांची दिवाळी अंधारात !

लातूर मनपावर कामगारांचा मोर्चा; दोन तास ठिय्या आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

लातूर : दिवाळीचा सण आला तरी शहरातील स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या घंटागाडी सफाई कामगारांना अद्याप पगार आणि बोनस मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे चारशे महिला-पुरुष कामगारांनी गुरुवारी कामबंद आंदोलन करीत लातूर महानगरपालिकेवर मोर्चा काढला. मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुमारे दोन तास ठिय्या देत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली. मात्र, मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी आणि प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप कामगार संघटनेने केला.

लातूर महानगरपालिकेने अशोक पाल यांच्या एजन्सीसोबत करार करून शहराच्या स्वच्छतेचे काम दिले आहे. या एजन्सीअंतर्गत सुमारे चारशे महिला-पुरुष घंटागाडी सफाई कामगार कार्यरत आहेत. मात्र, दिवाळी तोंडावर आली असतानाही या कामगारांचे वेतन आणि बोनस थकीत आहे.

सणासुदीच्या काळातही हातात पगार नसल्याने दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न कामगारांसमोर निर्माण झाला आहे. अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कामगारांनी कामबंद आंदोलन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून हलगीच्या निनादात आणि घोषणाबाजी करीत महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देऊन पगार व बोनस तातडीने द्यावा, कामगारांच्या प्रश्नांवर त्रिसदस्यीय बैठक घ्यावी आणि कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांना कामगार कायद्याची पुरेशी माहिती नसल्याची टीका करीत राजकुमार होळीकर यांनी प्रशासनावर निशाणा साधला. शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेनेच एजन्सी नियुक्त केली आहे.

त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांची जबाबदारी झटकता येणार नाही. कामगार कायद्याची अंमलबजावणी करून सफाई कामगारांना तातडीने पगार आणि बोनस द्यावा. ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडलीया आंदोलनाला भटक्या-विमुक्तांचे नेते प्रा. सुधीर अनवले, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते बसवंत अप्पा उबाळे आणि राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे. लातूर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक प्रा. शिवाजीराव जवळगेकर तसेच भाजपचे गटनेते अॅड. दीपक मठपती आणि अॅड. प्रदीप मोरे यांनी पाठिंबा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT