

मारोती बुद्रुक पाटील
अहमदपूर : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा,आनंदाचा आणि उत्साहाचा सण. कोजागरी पौर्णिमेपासूनच बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू होते. आकाशकंदील, पणत्या, फटाके, रोषणाई आणि सजावटीच्या वस्तूंनी दुकाने सजतात. मात्र यंदा तीव्र दुष्काळामुळे अहमदपूरच्या बाजारपेठेतील दिवाळीचा उत्साह हरवल्याचे चित्र आहे. दुकाने मालाने भरलेली असली, तरी ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने व्यापारी चिंतेत आहेत.
यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. शेतात पिके उभी राहण्याऐवजी जमिनीला भेगा पडल्या. कष्ट करूनही हातात उत्पन्न आले नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांच्या हातात पैसा नसल्याने दिवाळीचा सणही साधेपणाने साजरा करण्याची वेळ आली आहे. दैनंदिन गरजा भागविण्याची चिंता असताना सणासाठी खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही. याचा थेट फटका अहमदपूरच्या बाजारपेठेला बसला आहे.
व्यापाऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने दिवाळीचे साहित्य खरेदी करून दुकाने सजविली; मात्र विक्री अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने त्यांची गुंतवणूक अडकण्याची भीती निर्माण झाली आहे, असो व्यापारी नारायण नामदेव कोटगिरे म्हणाले, "दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेपासून ग्राहकांची खरेदी सुरू व्हायची. यंदा दुष्काळामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
आम्ही जवळपास ५० टक्के माल खरेदी करून ठेवला; पण तो विकला जाईल की नाही, याची चिंता आहे. व्यवसायावर मोठे संकट आले आहे. "ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला तरच बाजारपेठेत खरेदी वाढते. त्यातून व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि मजुरांच्या हाताला काम मिळते.
मात्र शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न घटले की त्याचे पडसाद संपूर्ण बाजारपेठेत उमटतात. यंदाची दिवाळी या वास्तवाची जाणीव करून देत आहे. दिवाळीच्या काळात गजबजणारी अहमदपूरची बाजारपेठ यंदा शांत आहे. सजलेली दुकाने, विक्रीच्या प्रतीक्षेत असलेला माल आणि ग्राहकांची वाट पाहणारे व्यापारी हे चित्र दुष्काळाच्या तीव्रतेची साक्ष देत आहे. शेतकऱ्याच्या शिवारात समृद्धी आली तरच बाजारपेठेत दिवाळीचा प्रकाश उजळेल, अशी भावना या परिस्थितीतून व्यक्त होत आहे.