औसा : औसा शहरातील जुन्या बसस्थानकासमोर बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) सकाळी एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तेजस गायकवाड (रा. भीमनगर, औसा) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारांसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, हल्लेखोर अक्षय नरवडे (रा. तलावाजवळ, समतानगर, औसा) हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
बुधवारी सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास जुन्या बसस्थानकासमोरील एका हॉटेलजवळ हा प्रकार घडला. अक्षय नरवडे याने तेजस गायकवाड याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हातात कोयता घेऊन असल्याने नागरिक त्याच्याजवळ जाण्यास धजावत नव्हते. घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाला होता. जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले.
औसा शहरात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.