चाकूर : चाकूर तालुक्यातील अजनसोंडा येथे मनरेगा कामाच्या पाहणीदरम्यान तक्रार न करण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी सुरू असताना एका व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात आठ जणांविरुद्ध अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिचंद्र सीताराम काकनाटे (रा. अजनसोंडा बु.) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अजनसोंडा गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मनरेगा कामाची पाहणी व तपासणी करण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी आले होते. त्यावेळी बालाजी पाटील चाकूरकर व त्यांच्यासोबतचे अन्य दोन जण तिथे आले आणि "मनरेगा समितीकडे तक्रारी करू नका, अन्यथा शासनाचा मिळालेला लाभ मिळू देणार नाही," अशी धमकी दिली.
मनरेगाचे काम व्यवस्थित सुरू असून चौकशी का केली जात आहे आणि मिळालेला लाभ मिळू द्यावा, असे सांगितले असतानाही त्यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ८ ऑगस्ट रोजी रात्री एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, याच प्रकरणा संदर्भात रात्री पावणेअकरा वाजता गंगाधर माधव कुमठेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ७ ऑगस्ट रोजी काही व्यक्तींसोबत अजनसोंडा बु. येथे ग्रामपंचायत कार्यालयातील कामाबाबत चौकशी करण्यासाठी गेले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचे सदस्य व गावकरी उपस्थित होते. यावेळी देविदास माने, महेश स्वामी, डी.एन. हाके, अजय हरी गायकवाड, अजिज शेख, अक्षय फुलारी, इंद्रजित माने आणि डी.एन. हाके यांनी एकत्र येऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली.
यावरून चाकूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवरून सुरू असून, अजनसोंडा येथील मनरेगा प्रकरणाच्या चौकशीदरम्यान एकमेकांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाल्याने चाकूर व परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.