Latur Congress protest  pudhari photo
लातूर

Latur Congress protest : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचे आंदोलन

लातूरमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध

पुढारी वृत्तसेवा

लातूर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी व पक्षपाती कारभाराच्या निषेधार्थ लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला उलटे टांगून जोडे मारण्यात आले. ‘व्होट चोरीविरोधात जनतेचा एल्गार’, ‘लोकशाही बचाओ’ आदी घोषणा असलेले फलक यावेळी लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत घोषणाबाजी केल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचा आरोप केला.

मतदार याद्यांमधून पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. संविधान आणि मतदानाचा अधिकार यांच्या रक्षणासाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असे ते म्हणाले.जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या वाढल्याचा दावा करत या वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले.

निवडणूक आयुक्तांच्या निर्णयप्रक्रियेबाबतही त्यांनी आक्षेप नोंदविला. आयोगाच्या कामकाजा-बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची चौकशी व्हावी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळेकर यांनीही निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा न दिल्यास आणि संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनाला महापौर जयश्री सोनकांबळे, प्रदेश सचिव ॲड. समद पटेल, विद्या पाटील, डॉ. दिनेश नवगिरे, एन. आर. पाटील, सचिन बंडापल्ले, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT