Panpatti Closed Latur
चाकूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाची औषधे, प्रतिबंधित गुटखा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद आता चाकूर शहरासह तालुक्यात उमटू लागल्याची चर्चा आहे. संभाव्य कारवाईच्या भीतीमुळे अनेक पानपट्ट्या बंद ठेवण्यात आल्याचे, तसेच काही व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे.
आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी अन्न सुरक्षा व ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित प्रकरणांवर कठोर भूमिका घेतली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांकडून सातत्याने तपासणी व धाडसत्र सुरू असल्याने व्यापारी वर्गात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाकूर शहरातही या कारवाईची चर्चा रंगली असून काही ठिकाणी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची उघड विक्री कमी झाल्याचे नागरिक सांगत आहेत. पानपट्ट्या, बेकरी, किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, दूध डेअरी तसेच हॉटेल व्यावसायिकांमध्येही संभाव्य कारवाईबाबत सावधगिरी बाळगली जात असल्याची चर्चा आहे.
ग्रामीण भागातही या घडामोडींचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पॉकेटबंद दुधाविषयी ग्राहकांमध्ये सावधगिरी वाढल्याने काही ठिकाणी थेट शेतकऱ्यांकडील दुधाला मागणी वाढल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे काही डेअऱ्यांमध्ये शेतकऱ्यांकडून दूध उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांमुळे भेसळखोर व्यापारी, प्रतिबंधित गुटखा विक्रेते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये कारवाईची भीती निर्माण झाली असून, प्रशासनाची पुढील मोहीम कोणत्या भागात पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारवायांचे नागरिकांकडून स्वागत
अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवायांमुळे अन्नसुरक्षा आणि पारदर्शकतेबाबत सकारात्मक संदेश गेला आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या या मोहिमेचे सामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात असून, भेसळखोरांवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या दुधाला वाढती मागणी?
ग्रामीण भागात पॉकेटबंद दुधापेक्षा थेट शेतकऱ्यांकडील दुधाला ग्राहकांची पसंती वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही दूध डेअऱ्यांना दूध संकलनात अडचणी येत असल्याचे सांगितले जात असले, तरी याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध झालेली नाही.