

They have been sending a truckload of grain to the Harinam Saptah at Chakarwadi for 26 consecutive years
लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर बाजार समितीला राज्यात मानाचे स्थान मिळवून देण्यात बाजार समितीतील विविध घटकांचा सिहांचा वाटा आहे. यासोबतच बाजार समितीतील या घटकांकडून सामाजिक बांधिलकीही जोपासली जात आहे. दरवर्षी विविध उपक्रम राबवून बाजार समितीतील घटक आपली सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करीत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणजे सद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा चाकरवाडी येथे होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहास गेल्या २६ वर्षांपासून धान्याचा ट्रक पाठविला जातो. यंदाच्या वर्षीही हा धान्याचा ट्रक माजी आमदार वैजनाथ शिंदे व सभापती जगदीश बावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चाकरवाडीकडे रवाना करण्यात आला आहे.
लातूर बाजार समितीने राज्यात मानाचे स्थान मिळविलेले आहे. हे स्थान मिळविण्यात बाजार समितीतील व्यापारी, आडते यांच्यासह विविध घटकांचा सिंहाचा वाटा आहे. बाजार समितीतील हे घटक केवळ व्यापारातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जोपासण्यातही अग्रेसर आहे. दरवर्षी बाजार समितीच्या आवारात या घटकांच्या वतीने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणजे चाकरवाडी येथे पार पडत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास गेल्या २६ वर्षापासून मोफत धान्य रवाना करण्यात येते. बाजार समितीतील विविध घटकांच्या सहकार्यातून हा ट्रक अखंड हरीनाम सप्ताहात होणाºया अन्नसेवेसाठी महत्वाचा ठरत आहे. याही वर्षी म्हणजे २७ व्या वर्षी आज हा धान्याचा चाकरवाडीकडे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला.
सदर ट्रक रवाना होण्यापूर्वी माजी आमदार वैजनाथ शिंदे व सभापती जगदीश बावणे, व्यापारी अशोक अग्रवाल, बालाप्रसाद बिदादा, संचालक अनिल पाटील, युवराज जाधव, अनंत पवार, श्रीनिवास शेळके, बालाजी वाघमारे, शिवाजी कांबळे यांच्यासह सुधीर गोजमगुंडे, अशोक लोया, अमर पवार, तुळशीदास गंभीर, रमेश सूर्यवंशी, सुरेश मालू, निवृत्ती ढवळे, गुलाब मोहिते यांची उपस्थिती होती.
रवाना झालेल्या या धान्याच्या ट्रकमध्ये १०२ तेल डब्बे, साखरेचे २३ पोते, गव्हाचे १७६ कट्टे, हरभरा डाळीचे ६२ कट्टे, तूर डाळीचे ७ कट्टे, एक मीठाचे पोते व चिंचेचा कट्टा या जिन्नसांचा समावेश होता. चाकरवाडी येथे होत असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहास या धान्याच्या माध्यमातून अन्नसेवेत महत्वाचे योगदान प्राप्त होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानोबा साखरे, सुधीर बोरुळे, संजय माने, बालाजी जाधव, डिगंबर माळवदे, व्यंकट शिंदे, नवनाथ कवितगे, श्रीराम गायकवाड, सुरेश देशमुख, जयकुमार गोरे आदींसह बाजार समितीतील विविध घटकांनी योगदान दिले होते.