चाकूर (लातूर) : स्मशानभूमीत शेड नसल्यामुळे भर पावसात एका वयोवृद्धावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ चाकूर तालुक्यातील कडमुळी गावकऱ्यांवर आली.
कडमुळी येथील मच्छिन्द्र गोरोबा कांबळे वय ६५ यांचा मृत्यू शुक्रवारी (दि.25) झाला. त्यांच्यावर शनिवारी (दि.26) स्मशानभूमी आणि शेड अभावी भर पावसात ताडपत्रीचा आधार घेवून त्यांचा अंत्यविधी उरकावा लागला. कडमुळी गावात बौद्ध समाजासाठी स्मशानभूमीसाठी आजही शेड नाही, पिण्याचे पाणी नाही, बसण्यासाठी व्यवस्था नाही. परिणामी, मच्छिन्द्र कांबळे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी भर पावसात प्लास्टिकच्या आडोशात करण्याची वेळ आली. याबद्दल गावकऱ्यांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्मशानभूमीसाठी २०२३ पासून सातत्याने निवेदने देवून पाठपुरावे करण्यात आले. यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी या स्मशानभूमीसाठी १० लाखांचा निधी मंजूर केला. मात्र स्थानिक राजकारण आणि अंतर्गत कुरघोडीमुळे तो निधी परत गेला असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्याबरोबरच प्रशासनाची उदासीनता आणि वेळखाऊ प्रक्रियेमूळे कडमुळीकरांनी संताप व्यक्त केला आहे. तहसीलदार नरसिंग जाधव यांच्याशी संपर्क केला असता कडमुळी ग्रामपंचायतला फीस भरून संबंधिताकडून जागेची मोजणी करून घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक गवई यांनी ग्रामपंचायतकडून मोजणीसाठी प्रस्ताव आल्यावर लवकरच जागेची मोजणी करण्यात येईल असे सांगितले.
जर निधी मंजूर झाला होता, तर काम का थांबवलं गेलं, याला कोण जबाबदार आहे, असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला असून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.