Lack of cleanliness in Chakur's government office itself
संग्राम वाघमारे
चाकूर तालुक्यात स्वच्छता मोहिमेचा डंका पिटणाऱ्या प्रशासनाच्या शासकीय कार्यालयातच घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेचे तीन तेरा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
चाकूर तालुक्यात तहसील कार्यालयाबरोबर पंचायत समिती कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्याचा कारभार चालवला जातो. या कार्यालयात शासनाकडून स्वच्छतेसाठी अनेक मोहीमा, उपक्रम राबवले जातात. परंतु चाकूरच्या सर्व शासकीय कार्यालयातच सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने शासनाच्या सुंदर माझे कार्यालयाच्या मोहिमेचा चांगलाच फज्जा उडाला आहे.
तंबाखू, गुटखा, मावा यांचे सेवन करून कर्मचाऱ्यांसह काही नागरिकांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, जि प बांधकाम, पाणीपुरवठा आणि मनरेगा कार्यालयाच्या भिती, कोपरे, पायऱ्या किळस येईल इतक्या लालेलाल केल्या आहेत.
शासनाकडून स्वच्छतेसाठी करोडो रुपयांचा निधी कार्यालयांना मिळत असताना, चाकूरमधील बहुधा शासकीय कार्यालयांतच अस्वछतेचा कळस पाहायला मिळाला. जागोजागी कचऱ्याचे ढीग व दुर्गंधी वामुळे कामानिमित्त आलेल्या अक्षरशः नाक दाबून कामे करावी लागत आहे. सुंदर माझे कार्यालय या घोषणा फक्त भिंतीवर आणि बाकी सर्व घाणीच्या खाईत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
तहसील कार्यालय आणि पंचायत समिती संपूर्ण तालुक्याला स्वच्छतेचे धडे देत असताना, स्वतःचे डोळे मिटून, स्वतःचे कार्यालय बकाल ठेवण्याचा प्रकार समोर येताच जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. कार्यालयात धुंकू नका असे लिहिलेल्या फलकांवरच तंबाखूच्या डागांनी तो फलक लालसर केला जातो. याहून गंभीर बाब म्हणजे, स्वच्छतेचा बोजा जनतेच्या डोक्यावर टाकणारे अधिकारी आणि कर्मचारीच कार्यालयात धूम्रपान व तंबाखूचे सेवन करताना दिसतात. मग नागरिक काय आदर्श घेणार? असा सवाल नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे.
अधिकारी कर्मचारी आणि नागरिकही भिंती रंगवण्याच्या स्पर्धेत उतरतात त्यामुळे कार्यालये घाणीच्या विळख्यात अडकून पडली आहेत. अनेक कार्यालयात शौचालयाचीही नीट सोय नसल्याने वयस्कर महिला, ज्येष्ठ नागरिकांना उघड्यावर विधी उरकण्याची वेळ येते. हे सर्व घडत असताना कार्यालयातील जबाबदार अधिकारी, कर्मचारी डोळे, नाक, कान बंद करून मस्त वावरताना दिसतात. शासकीय कार्यालये घाणीच्या विळख्यातून कधी मुक्त होतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसेंदिवस शासकीय कार्यालयात धुंकण्याचे प्रकार घडत असताना याचे अधिकारी, कर्मचारी यांना कसलेही सोयरसुतक नसल्याची उलट सुलट चर्चा नागरिकांतून होत आहे.