

शिरूर अनंतपाळ तालुक्यात अवैध देशी दारू विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढत असून, साकोळ, येरोळ, हिप्पळगाव, उजेड, गणात आदी भागांमध्ये हा धंदा उघडपणे सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून समोर येत आहे. चढ्या दराने होत असलेली विक्री, तसेच संबंधित विभागांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा तालुक्यात तीव्र होत आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलीस विभाग, एलसीबी पथक आणि दारुबंदी विभाग अशी तीन यंत्रणा कार्यरत असतानाही अवैध दारू व्यवसायावरील नियंत्रण शिथिल दिसत आहे. काही दुकानचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, काही ठिकाणी तथाकथित “हफ्ता” वाढल्याने दारू चढ्या दराने विकावी लागत असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, आरीमोड येथील एका धाब्यावर एलसीबी पथकाने अचानक धाड टाकल्याचा प्रकारही उघडकीस आला. जेवणाच्या कारणाने धाब्यात प्रवेश केलेल्या पथकाने मागील बाजूस ठेवलेल्या दारूची माहिती मिळताच, ती आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. त्याच्याकडून शहरातील बसवेश्वर चौकातील एका दुकानातून दारू मागवण्यात आली होती, असा आरोप स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओदेखील काही जणांनी मोबाईलवर रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झाल्याची माहिती उपलब्ध नाही.
अवैध दारू सहज उपलब्ध असल्याने काही तरुण वयोगट या विळख्यात अडकत असल्याची चिंता पालक आणि समाजातील सजग नागरिकांनी व्यक्त केली आहे. व्यसनामुळे कुटुंबांचे नुकसान, महिलांवरील ताणतणाव, आर्थिक हानी आणि सामाजिक वातावरणावर होणारे दुष्परिणाम याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, "या व्यवसायामुळे कोणाचे संसार उद्ध्वस्त झाले, कोण व्यसनाधीन झाले, कोण संकटात सापडले याकडे कुणाचे लक्ष नाही; फक्त हफ्त्याचा प्रश्न पुढे येतो," अशी भावना पसरत आहे. तालुका प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.