

Ahmedpur teachers protest
अहमदपूर: टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागणी संदर्भात शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीने पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला शुक्रवारी (दि.५) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तालुक्यातील जि.प.चे ४९८ शिक्षक आंदोलनात सहभागी होण्यासाठी सामुदायिक रजेवर गेल्यामुळे जिल्हा परिषदेच्या १२३ शाळा बंद होत्या. त्यामुळे दिवसभर कुठलेच शैक्षणिक कामकाज होऊ शकले नाही. सर्वोच्च न्यायालयातील टीईटी प्रकरणामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. याशिवाय शिक्षकाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.
यात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी. १५ मार्च २०२४ संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पद भरती तात्काळ सुरू करावी. शिक्षकांवरील अशैक्षणिक उपक्रम व ऑनलाईन कामे तात्काळ थांबवावीत. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरू ठेवावेत.
या प्रमुख मागणीसह लातूर जिल्ह्या परिषदेंतर्गत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाच्या वतीने शाळा बंदची हाक देण्यात आली होती. याच उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२३ व खाजगी १० व या शाळेतील अध्ययन अध्यापन करणारे जि.प.चे ४९८ व खाजगी शाळेतील २५६ शिक्षक असे एकूण ७५४ शिक्षक सामुदायिक रजेवर गेले होते.