जळकोट : हवामान खात्याने यंदाच्या मान्सून हंगामात एल-निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जळकोट तालुका प्रशासन सतर्क झाले आहे. उपलब्ध जल साठ्याचा काटकसरीने वापर व्हावा तसेच प्रकल्पांमधील आरक्षित पाण्याचा अवैधरीत्या उपसा होऊ नये यासाठी जळकोट तालुका प्रशासनाने विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.
जिल्हाधिकारी लातूर यांच्या आदेशानुसार तालुक्यातील विविध प्रकल्प परिसरात सुरू असलेल्या अवैध पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी मोटारी जप्त करणे, विद्युत पुरवठा खंडित करणे आणि संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी महसूल, पंचायत राज, वीज वितरण कंपनी आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता महेश वाघमारे पाटील यांना आपल्या अधिनस्त लाईनमन व वायरमन यांना पथकासोबत उपस्थित ठेवून अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारींच्या वीज जोडण्या तात्काळ खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच गट विकास अधिकारी ऐश्वर्या चितारी यांनी तालुक्यातील ग्राम पंचायत अधिकारी यांना आवश्यक आदेश देऊन कारवाईत सहभागी करुन घेण्यास सांगण्यात आले आहे.
पुरवठा निरीक्षण अधिकारी अर्पण राऊत, नायब तहसीलदार सुहास मुळजक, मंडळ अधिकारी विष्णू तिडके, नायब तहसीलदार रंगनाथ कराड, मंडळ अधिकारी हंसराज जाधव, विस्तार अधिकारी शिवकांत पटवारी, शाखा अभियंता ए डी त्रिपाठी, विस्तार अधिकारी ,जयवंत कोनाळे, विस्तार अधिकारी ऋषिकेश भारती, कनिष्ठ अभियंता संजय घोलपे यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पथक प्रमुखांच्या नेतृत्वाखाली एकूण 15 पथके स्थापन करण्यात आली आहेत.
पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोटारी व इतर साहित्याचा ग्राम महसूल अधिकारी आणि ग्राम पंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त पंचनामा करण्यात येणार असून, संबंधित साहित्याची यादी पंचायत समिती कार्यालयात जमा केली जाणार आहे.
सोनवळा साठवण तलाव, हळदवाढवणा साठवण तलाव, माळहिप्परगा साठवण तलाव, रावणकोळा साठवण तलाव, केकतसिंदगी साठवण तलाव, चेरा साठवण तलाव - 1, चेरा साठवण तलाव - 2, ढोरसांगवी साठवण तलाव, हावरगा लघुसिंचन तलाव, जंगमवाडी लघु तलाव, डोंगरगाव साठवण तलाव, गुत्ती साठवण तलाव - 1, गुत्ती साठवण तलाव - 2, धोंडवाडी साठवण तलाव, शेलदरा साठवण तलाव या 15 तलावांसाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे पथके नेमण्यात आली आहेत.