Housing installment payments are stalled; the increased subsidy is not being received
जळकोट, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात विविध योजनांतून घरकुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. सध्या या घरकुल लाभार्थीच्या अनुदानाचे हप्ते रखडले आहेत. वाढीव अनुदानाची घोषणा होऊनही ते मिळत नाही. मोफत वाळू पुरवठा करण्याचे धोरणही कागदावरच आहे. त्यामुळे तालुक्यातील घरकुलच्या गोरगरीब लाभार्थ्यांना अडचणींच्या डोंगराशी मुकाबला करावा लागत आहे. डोक्यावर छप्पर नसलेल्या या लाभार्थीचा कैवार घेऊन प्रशासनाने त्यांची डोकेदुखी कमी करावी, अशी मागणी तहसीलदार राजेश लांडगे व गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासंबंधी सरपंच संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा पाटोदा बु. (ता. जळकोट) येथील सरपंच सुनील मारुतीराव नामवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर करण्यात आलेल्या ५० हजार रुपयांच्या वाढीव अनुदानाची अमलबजावणी तातडीने करण्यात यावी.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार २०२४२५ मध्ये उद्दिष्ट मिळालेल्या मंजूर घरकूल लाभार्थ्यांना ३५००० रुपये घरकुल बांधकामासाठी व १५,००० रुपये सौर ऊर्जा प्रणालीसाठी वाढीव अनुदान (प्रधामंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत १ किलो व्हॅट सौर ऊजर्जा देण्यात येणार होते मात्र अद्यापपर्यंत प्रत्यक्ष लाभकोणत्याही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.
बांधकाम साहित्याचे वाढते दर व शासनाकडून मिळणारे अल्प अनुदान यामुळे अनेक घरकुलांचे बांधकाम रखडलेले आहे. काहीनी स्वतःच्या खर्चावर घरकुल पूर्ण केले आहे. तरीही त्यांना वाढीव ५० हजार रुपये अनुदान मिळालेले नाही. गरीब व गरजू कुटूंबाना कायम स्वरुपी घर उपलब्ध करुन देणे हे घरकुल योजनेचे उद्दिष्ट आहे.
तथापि, असे असूनही वाढीव अनुदानाची अमलबजावणी होत नसल्याने ग्रामीण भागात संधमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या ५० हजार रुपये वाढीव अनुदानाची रक्कम कोणत्या टप्प्यात व कोणत्या प्रक्रियेत व्दारे देणार याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करुन तातडीने प्रत्यक्ष लाभ द्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुनील नामवाड यांनी केली आहे.
या शिष्टमंडळात सहभागी होत तालुक्यातील अनेक सरपंच यांनी घरकुल लाभार्थीच्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या. तसेच जळकोट तालुक्यातील घरकुल लाभार्थीचे रखडलेले अनुदान हप्ते तातडीने अदा करावेत, शासन धोरणानुसार घरकुल लाभार्थीना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे काँग्रेस (आय चे जळकोट तालुकाध्यक्ष मारुती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, युवा नेते सचिन राजेंद्र केंद्रे, दत्तात्रय पवार, संभाजी कोसंबे, अक्षय बडगिरे, प्रमोद दाडगे, संग्राम नामवाड, अनील सोनकांबळे, मैनोद्दिन बिरादार, संग्राम कांबळे, नूर पठाण, सुनील भालेराव, जावेद मुंजेवार यांच्यासह ३१ जणांनी केली आहे.