लातूर : उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १० लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. आखीब मुसाभाई मिर्झा (वय २७, रा. मदिना नगर, उदगीर) असे त्याचे नाव आहे,
२४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांना अवैधरीत्या गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी पथकास कारवाईचे आदेश दिले. नाईक चौक परिसरात संशयित वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी पाठलाग करून नागलगाव परिसरात वाहन पकडले. तपासणी दरम्यान आखीब मुसाभाई मिर्झा हा आरोपी आढळून आला. त्याच्याकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल गुटखा जप्त करण्यात आला.
हा माल फिरोज पटवेकर (रा. नळेगाव) यांच्याकडे आर्थिक फायद्यासाठी नेत असल्याचे आरोपीने सांगितले. या कारवाईत अंदाजे २ लाख ८० हजार ८०० रुपये किमतीचा गुटखा व कार किंमत सुमारे ७ लाख ५० हजार असा एकूण १० लाख ३० हजार ८०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.