निलंगा : ग्रामीण भागातील पालकांमध्ये शहरातील इंग्रजी शाळा व खासगी शाळेच्या वाढत्या आकर्षणामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे प्रत्येक वर्षी शिक्षकांची संख्या कमी होत असून भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जे पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देतील, त्या कुटुंबाकडून ग्रामपंचायत कोणतीही कर आकारणी करणार नाही, असा निर्णय सिंदखेड ग्रामपंचायतीने घेतला आहे.
अडीच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावच्या सर्वांगीण विकासासाठी व खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी गावची सत्ता युवकांच्या हाती देण्याचा निर्णय निलंगा तालुक्यातील सिंदखेड येथील ग्रामस्थांनी घेतला. रावसाहेब आंबिलपूरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला बहुमताने निवडून देत थेट सरपंच म्हणून नागनाथ आंबिलपूरे या तरुणाला निवडून दिले. ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यात रावसाहेब आंबिलपूरे यांनी गावाच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवर आणि माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे प्रयत्न करुन मोठा विकासनिधी मंजूर करून घेतला. जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावात मुबलक पाण्याची व्यवस्था, गावअंतर्गत पाईपलाईन व नळजोडणी, गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात आले. याबरोबरच गावातील मयत झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने २१०० रुपये देण्याचा उपक्रमही गतवर्षीपासून सुरू केला आहे.
मागच्या काही वर्षांपासून पालक आपल्या मुलांना निलंग्याला इंग्रजी व खाजगी शाळेत पाठवत असल्याने गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत चालली आहे. परिणामी शिक्षकांची संख्या कमी होऊन शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी जे पालक जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेतील. त्या कुटुंबाला ग्रामपंचायतीच्या वतीने कर माफी करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.