

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी वेतनातून थेट होणारी वर्गणी, पतसंस्था हप्ता अशा कपातीला वित्त विभागाने ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अशी कोणतीही कपात न करता वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. दरम्यान, संघटनांच्या अतंर्गत वादाचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
जि.प. कर्मचाऱ्यांचे वेतन वित्त विभागाकडून जमा होते. विविध संवर्गातील असलेल्या पतसंस्थेतून कर्ज घेतलेले असल्याने या कर्जाचे हप्ते वेतनातून वर्ग होत असे. याशिवाय काही पतसंस्थांची वर्गणी देखील वेतनातून कपात केली जात होती. विविध प्रकारची नियमित कपात होऊन वेतन कर्मचाऱ्यांना मिळत होते. परंतु, या कपातीवर ग्रामसेवक संघटनांनी आक्षेप घेतली आणि ही कपात रद्द करण्याची मागणी वित्त विभागाकडे केल्याचे बोलले जात होते. ग्रामपंचयात विभागातंर्गत ग्रामसेवक संघटना कार्यरत असून या संघटनेत उभी फूट पडली आहे. आता दोन संघटना उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे एका संघटनेने या कपातीवर आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने पतसंस्थाच नव्हे तर इतर कुठल्याही स्वरुपाची कपात यापुढे वित्त विभागामार्फत न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम ग्रामसेवक संघटनांच्या पतसंस्थेवर होणार असून यापुढे कर्मचाऱ्यांच्या बॅंकेत वेतन जमा झाल्यानंतर बँकेमार्फत ही कपात होणार आहे.