Government stands by farmers: Chief Minister
औराद शहाजानी, पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेरणा व मांजरा नदीच्या काठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी (दि. २४) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औराद शहाजानी येथे दौरा करून पूरस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
मे महिन्यातील अवकाळी पाऊस आणि जूनपासून आतापर्यंत अकराशे मिलीमीटर पाऊस झाला. मांजरा व तेरणा नदी मागील आठवड्यापासून पाणी पात्राच्या बाहेर दुधडी भरून वाहत आहे. मांजरा नदीच्या तीव्र प्रवाहामुळे तेरणेचा प्रवाह अडून तेरणेचे बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे औराद शहाजानी येथील तेरणा व मांजरा नदीकाठची जवळपास दोनशे हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन अनेक दिवसांपासून पाण्याखाली आहे.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समवेत औराद शहाजानी येथील तेरणा व मांजरा नदीच्या संगमावर पूरस्थितीची पाहणी केली आणि तेथील शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली.
नदीकाठच्या शेतजमीनी खरडून जाऊ नये म्हणून भूररक्षक तटबंदी व बॅरेज बांधण्याचे नियोजन त्यांनी सांगितले. तसेच सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई व मदत दिवाळीपूर्वी देण्याचे त्यांनी आश्वासन दिले व शेतकऱ्यांना धीर दिला. त्याचबरोबर प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
याप्रसंगी परत जाताना त्यांनी तेरणा नदीवरील पुलावर थांबून पाण्याचा प्रचंड प्रवाह व पूरस्थितीची पाहणी केली. नागरिक व शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, अरविंद पाटील निलंगेकर, भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, अजित पाटील कव्हेकर व इतर भाजप पदाधिकारी, शेतकरी, सरपंच आदी उपस्थित होते.