

Latur Ujani Crop damage inspection CM
लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा मतदारसंघातील उजनी येथे भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. सर्व निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात येईल, घोषित मदतीच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांना वाढीव मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि टंचाई, दुष्काळात लागू केल्या जातात त्या सर्व उपाययोजना लागू करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री फडवणीस यांनी केली.
यावेळी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारही मदत करणार आहे. केंद्राने एनडीआरएफमध्ये अॅडव्हानमध्ये पैसे दिले आहेत ते वितरीत करत आहोत. मंत्रीमंडळात जो काही निधी लागेल तो देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं.
त्यांनी धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गाबद्दल देखील वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत सांगायचं झालं तर ज्यावेळी ढगफुटीसारखा पाऊस होतो. त्यावेळी नियमीत नियोजनानं पाणी सोडलं जाऊ शकत नाही. तरी पाणी सोडण्यात काही चूक झाली आहे का याची देखील चौकशी करू. केवळ धरणाचा विषय नाही. कॅचमेंट एरियात मोठा पाऊस झाला आहे. निसर्गाचा चक्र बदललं आहे. आपण याकडं लक्ष देत आहोत.'