Latur News : दिवाणी शेलगावला जाताय ? जरा जपून..! file photo
लातूर

Latur News : दिवाणी शेलगावला जाताय ? जरा जपून..!

रस्त्याची दयनीय अवस्था : ग्रामस्थांचा संताप, जीव मुठीत धरून प्रवास; दुरुस्तीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Going to Diwani Shelgaon? Be a bit careful...!

रत्नापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात एकीकडे महामार्गाचे जाळे विस्तारत असून गावागावांत सिमेंट रस्ते उभारले जात आहेत. मात्र दुसरीकडे अनेक ग्रामीण रस्ते आजही दुर्लक्षित अवस्थेत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कळंब तालुक्यातील दिवाणी-शेलगाव रस्ता हे त्याचेच ज्वलंत उदाहरण बनले आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दिवाणी-शेलगावकडे वळल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याचे काम झाले नसल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे "रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता?" अशी परिस्थिती निर्माण झाली असून वाहनचालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या मार्गावरून दिवाणी-शेलगावसह परिसरातील अनेक विद्यार्थी येडशी, येरमाळा आदी ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करतात. तसेच जिल्हा मुख्यालय धाराशिव येथे शासकीय व इतर कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्यावरील खड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे.

ग्रामस्थ खंडेराव भातलवंडे यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले की, "रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, आता चारचाकी वाहन तर दूरच, बैलगाडीनेही प्रवास करणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढतो. अनेक वर्षापासून मागणी करूनही प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले

आहे. "स्थानिक नागरिकांनी वारंवार निवेदने देऊनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामीण भागातील विकासाच्या घोषणा केल्या जात असताना दिवाणी-शेलगावसारख्या महत्त्वाच्या संपर्क रस्त्यांची झालेली दुर्दशा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पालकमंत्री यांनी या रस्त्याची तातडीने पाहणी करून निधी उपलब्ध करून द्यावा व रस्त्याचे दर्जेदार काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे. "महामार्गाच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांचाही विकास झाला तरच खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास साध्य होईल," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT