

Suhagan Avhai Road Work
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सुहागन ते हयातनगर शिवरस्ता हद्दीपर्यंतचे रखडलेले रस्ता काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. अपूर्ण अवस्थेत सोडून दिलेल्या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांच्या घटनाही वाढत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा ते हयातनगर शिवरस्ता हद्दीपर्यंत मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एका ठेकेदाराकडे देण्यात आले होते. सुरुवातीला पूर्णा ते सुहागन शिवार कॅनॉलपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पुढील काम अचानक बंद पडले.
या घटनेला तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी सुहागन कॅनॉल ते हयातनगर शिव हद्दीपर्यंतचे काम अद्याप रखडलेलेच आहे. अर्धवट अवस्थेत सोडून दिलेला रस्ता सध्या पूर्णपणे उखडून गेला असून मोठमोठ्या गिट्ट्यांमुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत असून अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी करत सुहागन येथील ग्रामस्थ बालाजी भोसले, संजय भोसले, सुंदरजी भोसले, रामचंद्र भोसले, कृष्णाजी भोसले, धनंजय भोसले, संतोष भोसले, चांदोजी गावंडे आणि हरिभाऊ बुचाले यांनी नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या खराब रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होऊन परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनपूर्वी रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम उपविभाग पूर्णाचे उपअभियंता संजय देशपांडे यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदार काम पूर्ण करण्यास तयार आहेत. मात्र, वाहन यंत्रणेसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तसेच आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे रस्ता बांधकामासाठी आवश्यक डांबराचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीअभावी ठेकेदारांची बिले प्रलंबित असल्यानेही कामावर परिणाम झाला आहे.
दरम्यान, सुहागन गावांतर्गत प्रस्तावित सिमेंट रस्त्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या उन्हाळ्यामुळे पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत असल्याने त्या कामालाही विलंब होत असल्याचे त्यांनी नमूद केले.