Ganja Cultivated in Sugarcane Field; Farmer Arrested
लातूर, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि. १८ मार्च) धडक कारवाई करत गोंदेगाव येथे गांजाची अवैध लागवड उघडकीस आणली. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून सुमारे ५ लाख २२ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोंदेगाव (ता. जि. लातूर) येथील राजकुमार छत्रभुज देशमुख (वय ५६) हा स्वतःच्या शेतात उसाच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड करत असल्याचीगुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार छापेमारी करण्यात आली. छाप्यात गट क्रमांक १३२ मधील शेतात उसामध्ये लपवून लावलेली एकूण १०८ गांजाची झाडे आढळून आली.
ही झाडे पंचासमक्ष मुळासकट उपटून जप्त करण्यात आली. त्यांचे एकूण वजन ३४ किलो ८०५ ग्रॅम असून अंदाजे किंमत ५ लाख २२ हजार ७५ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पथकप्रमुख म्हणून काम पाहिले. कारवाईदरम्यान कायदेशीर पारदर्शकता राखण्यासाठी महसूल व इतर शासकीय यंत्रणांचा समन्वय साधण्यात आला.
यामध्ये नायब तहसीलदार गजानन अंबर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, सफौ सर्जेराव जगताप तसेच पोलीस अंमलदार मोहन सुरवसे, चंद्रकांत डांगे, सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, सचिन धारेकर, तुळशीराम बरुरे व पाराजी पुटेवाड, प्रदीप चोपणे, संतोष खांडेकर, शासकीय व्हिडिओग्राफर सुहास जाधव तसेच वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक टी. टी. टेकाळे, कृषी विभागाचे शासकीय पंच राहुल अंधारे व दिलीप पोतदार यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. संपूर्ण कारवाई व्हिडिओग्राफीद्वारे नोंदविण्यात आली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एमजीपीएस अॅक्ट १९८५ अंतर्गत कलम ८ (क) व २० (क) अन्वये गातेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.