Gadkari gives green light to multi-crore road projects. Follow up of Abhimanyu Pawar
लातूर, पुढारी वृत्तसेवा : औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांनी बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रलंबित रस्ते प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे
औसा-लामजना-किल्लारी-उमरगा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला 1 मंजुरी मिळाल्याने भूकंपग्रस्त भागातील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे. या मार्गामुळे निळकंठेश्वर मार्ग, महापुरुष मार्ग, संत मारुती महाराज मार्ग तसेच लातूर-औसा-उमरगा महामार्ग यांना जोडणारा दर्जेदार रस्ते कॉरिडॉर विकसित होणार असून उद्योग, व्यापार आणि शेतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. औसा शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उड्डाणपूलाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच प्रस्तावित पूर्व बाह्यवळण रस्त्यालाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या बायपासमुळे शहरातील अवजड वाहतूक बाहेर वळविण्यास मदत होऊन वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे. लातूर शहरासाठी पेठ-चांडेश्वर-कव्हा बाभळगाव-भातखेडा-खुलगापूर-नांदगाव-रायवाडी-हरंगुळ खं डापूर-गंगापूर-पेठ असा सुमारे साठ किलोमीटर लांबीचा आऊटर रिंगरोड राष्ट्रीय महामार्ग म्हणूनविकसित करण्याचा प्रस्तावही पुढे सरकला आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. याशिवाय गरुड चौक ते नवीन रेणापूर नाका या सुमारे पाच किलोमीटर मार्गावर उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लातूर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
औसा येथील उजनी मोड चौक हा दोन राष्ट्रीय महामार्गांचा महत्त्वाचा संगम असल्याने येथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी चौकाचे रुंदीकरण व सुधारणा करण्याचा प्रस्तावही मंजुरीसाठी पुढे नेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हे काम लवकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या प्रकल्पांची अंमलबजावणी झाल्यानंतर औसा आणि लातूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. नागरिकांचा प्रवास सुलभ होण्याबरोबरच औद्योगिक गुंतवणूक, व्यापार, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे.